VIDEO- 14 वर्षांच्या गौरवीचे समुद्रात 36 किमीचे थक्क करणारे स्विमिंग
By Admin | Published: March 26, 2017 07:54 PM2017-03-26T19:54:29+5:302017-03-26T20:01:38+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 26 - जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्न करत राहण्याची इच्छाशक्ती हवी. जिद्दीच्या जोरावर ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्न करत राहण्याची इच्छाशक्ती हवी. जिद्दीच्या जोरावर कोणतंही यशोशिखर गाठता येते याची प्रचिती उदयपूरच्या 14 वर्षांच्या गौरवी सिंघवीनं दिली आहे. लहानपणापासून पोहण्यात तरबेज असलेल्या गौरवीनं वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे अरबी समुद्रातील 36 किलोमीटरचं अंतर अवघ्या 6 तास 35 मिनिटांत पूर्ण केलं आहे. त्यामुळे तिच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी तिनं अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत समुद्रातील 36 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. विशेष म्हणजे या मार्गावर 36 किलोमीटरचं अंतर पार करणारी ती पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेनं गौरवीला 36 किलोमीटर अंतर पार करणारी पहिली महिला जलतरणपटू म्हणून प्रमाणित केलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लेकसिटीच्या या गौरवीनं ख-या अर्थानं राजस्थानच्या उदयपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गौरवी हे ध्येय गाठण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून परिश्रम करत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तिने मुंबईतल्या गव्हर्नर हाऊस ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचे 16 किलोमीटरचं अंतर 3 तास 58 मिनिटांत पूर्ण करून स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला होता. होळीच्या एक दिवस अगोदरच गौरवीनं फतेहसागरमध्ये 20 किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. गौरवी मुंबईतलं 16 किलोमीटरचं अंतर 4 तासांहून कमी वेळात पार करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या मार्गावर हा रेकॉर्ड बनवणारी ती सर्वात कमी वयाची जलतरणपटू ठरली होती. यापूर्वी हा रेकॉर्ड उदयपूरच्या भक्ती शर्मा आणि एका पुरुषाच्या नावे होता. भक्तीनं 4 तास 15 मिनिटं, तर एक पुरुष जलतरणपटूनं 4 तास 12 मिनिटांत हे 16 किलोमीटरच अंतर पार केलं होतं.
गौरवीनं राज्य जलतरणाच्या स्पर्धेतही तीन सुवर्णपदकं पटकावली आहेत. गौरवीची देशासाठी जलतरण स्पर्धेत पदक मिळवण्याची इच्छा असल्यानं ती लागोपाठ प्रयत्नशील आहे. तिच्या या यशात तिचे स्विमिंग कोच महेश पालीवाल यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच गौरवी सिंघवी हे यशोशिखर गाठू शकली आहे.
महेश पालीवाल म्हणाले, गौरवीची पोहण्याची क्षमता चांगली आहे. पहिल्यांदा तिला पोहताना पाहिलं, तेव्हा समजलं होतं की, गौरवी पोहण्यात तरबेज आहे. ती थंडीच्या मोसमातही लागोपाठ 6 ते 8 तासांपर्यंत पोहण्याचा सराव करत होती. त्याच्याच जोरावर तिने हे 36 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे.
https://www.dailymotion.com/video/x844unp