Video: ...अन् मुख्यमंत्री शिंदेंनी शरद पवारांचा हात धरला; आदरयुक्त सन्मान दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:21 PM2023-11-02T13:21:05+5:302023-11-02T13:22:39+5:30
राजकीय संस्कृती जपण्याची व ज्येष्ठांचा आदर ठेवण्याची कृती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली.
मुंबई - ज्या मैदानावर क्रिकटचे धडे गिरवले, त्याच मैदानावर स्वत:च्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य लाभलं असा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कृतीचं कौतुक होत आहे. आयसीसी व बीसीसीआयचे माजी चेअरमन शरद पवार यांचा हात धरुन पुतळा अनावरणाचे बटन दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आदरयुक्त सन्मान केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे
वानखेडे स्टेडियममधील या पुतळा अनावरण सोहळ्याला दस्तुरखुद्द भारतरत्न सचिनसह त्याचे कुटुंबीय, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करत स्वत: त्यांचा हात धरुन पुतळा अनावरण उद्घाटनाचे बटण दाबले. राजकीय पक्षांचा विचार केल्यास शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची व ज्येष्ठांचा आदर ठेवण्याची कृती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली.
#WATCH | Statue of Cricket legend Sachin Tendulkar unveiled at Wankhede Stadium in Mumbai.
— ANI (@ANI) November 1, 2023
Sachin Tendulkar, Maharashtra CM Eknath Shinde, BCCI Secretary Jay Shah, BCCI Vice President Rajeev Shukla, NCP chief and former BCCI & ICC chief Sharad Pawar, MCA President Amol Kale and… pic.twitter.com/X5REr5yUJO
पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात येणार होते. त्यासाठी, सचिनसह आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीयचे पदाधिकारीही उपस्थित होते. सचिनने एकदा पुतळ्याकडे पाहिले आणि पुतळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी बटन दाबण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा शरद पवार हे मागे आहेत, हे लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा हात धरुन, त्यांना बटण दाबण्यासाठी पुढे घेत सन्मान दिला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
२२ फूट उंचीचा पुतळा
एकूण २२ फूट उंचीचा असलेला सचिनचा हा पुतळा सरळ दिशेने हवेत फटका मारतानाच्या शैलीत आहे. विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा बसविण्यात आला असून संपूर्ण पुतळा ब्राँझचा आहे. सचिनने यंदा एप्रिलमध्ये वयाचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचा सन्मान करण्यासाठी एमसीएने वानखेडे स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळा स्थापन केला. सचिनने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवण सागितली. 'मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून आणण्यात आले होते,' अशी आठवण सचिनने सांगितली.
तेव्हा लपवून मैदानावर आलो होतो
सचिन म्हणाला, ‘वानखेडेवरील माझी पहिली भेट मजेशीर होती जी कोणाला माहीत नाही. १९८३च्या विश्वचषकानंतर वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता. तो सामना पाहण्यासाठी मी मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांसह वानखेडे स्टेडियमला आलेलो. आमची जागा नॉर्थ स्टँडमध्ये होती. परतताना कोणीतरी म्हटले की, 'झालं ना मॅनेज व्यवस्थित.' आम्ही २५ जण होतो आणि तिकीट २४ होते. सर्वांनी मला लपवून आतमध्ये नेले होते. आज याच स्टेडियमवर स्वत:चा पुतळा पाहणे अभिमानास्पद आहे.' यावेळी सचिनने भारतीय संघाचे कर्णधारपद तंदुरुस्तीमुळे नाकारून महेंद्रसिंग धोनीकडे का सोपविण्यास सांगितले, याची आठवणही सांगितली.