Join us

Eknath Shinde: 'अण्णा, आशीर्वाद राहू द्या, आदेश देत जा'; मुख्यमंत्र्यांचा अण्णा हजारेंना Video कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 6:41 PM

मुंबईला येण्यापूर्वी गोव्यातील हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंशी संवाद साधला

मुंबई - राज्याच्या राजकारणातील अविश्वसनीय सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. या सत्तासंघर्षानंतर आता विधिमंडळ सभागृहात बहुमत चाचणी करण्याचा पुढील अध्या आहे. त्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील 50 आमदार तयारीनिशी उतरत आहेत. तत्पूर्वी एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका आणि व्हिजन मांडत आहेत. आता, मुख्यमंत्री शिंदे यांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी संवाद साधतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

मुंबईला येण्यापूर्वी गोव्यातील हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंशी संवाद साधला. यावेळी, आपले आशीर्वाद असू द्या, मार्गदर्शन असू द्यात आणि हक्काने आदेश देत जा.. असे म्हणत अण्णांना त्यांनी प्रणाम केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यावेळी, त्यांचे विश्वासू शिलेदार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हातात मोबाईल धरल्याचे दिसून येते.

नमस्कार अण्णा, एकनाथ शिंदे बोलतोय. अण्णा - तुमचे अभिनंदन मुख्यमंत्री - खूप खूप आभारी आहे...

अण्णा, तुमचा आशीर्वाद असू द्यात, शुभेच्छा असू द्या. मार्गदर्शन करत राहा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अण्णा हजारेंसोबत संवाद साधला. जेव्हा जेव्हा काही लागेल तुम्हाला, तेव्हा आदेश करत जा, राज्याच्या हितासाठी आणि जनतेला अपेक्षित असं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आम्हाला आदेश देत जा... असेही मुख्यमंत्र्यांनी अण्णांसोबत बोलताना म्हटले. 

50 आमदारांना घेऊन मुंबईकडे रवाना

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावत धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व खात्यांच्या रितसर बैठका शिंदे आणि फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत. तर, दुसरीकडे आपल्यासोबत बंडखोरी केलेल्या 50 आमदारांच्याही संपर्कात एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच, ते 50 आमदारांना मुंबईला आणण्यासाठी स्वत: गोव्याला गेले आहेत. शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. ते आमदारांना घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.  

टॅग्स :एकनाथ शिंदेअण्णा हजारेमुंबईशिवसेना