Join us

Video: राजभवनात दोन मोरांमध्ये आधी वादावादी, मग तुंबळ युद्ध; युजर्सना अधिवेशनच आठवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 2:28 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलेला व्हिडिओ पाहून अनेकांना विधानसभाच आठवली.

ठळक मुद्दे''पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच राजभवनातील हिरवळीजवळ दोन मोरांमध्ये अधिवासावरून अगोदर वादावादी आणि नंतर तुंबळयुद्ध झाले !!'', असे कॅप्शनही कोश्यारी यांनी दिलं आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेत सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एमपीएससी आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. चक्क विधानसभेतच मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर जाण्यापर्यंत राडा झाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे, भाजपाने दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली असताना दुसरीकडे राज्यपालांनी मोराच्या तुंबळयुद्धचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यपाल यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलेला व्हिडिओ पाहून अनेकांना विधानसभाच आठवली. विधानसभेतही भाजप विरुद्ध सत्ताधारी असा रंगलेला सामनाच आठवला. त्यामुळे, राज्यपालांनी टायमिंग साधत हा व्हिडिओ शेअर केल्याने अनेकांनी ही मजेशीर बाब असल्याचं म्हटलंय. ''पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच राजभवनातील हिरवळीजवळ दोन मोरांमध्ये अधिवासावरून अगोदर वादावादी आणि नंतर तुंबळयुद्ध झाले !!'', असे कॅप्शनही कोश्यारी यांनी दिलं आहे. 

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदरांनी सभागृहात जाणे टाळले. सभागृहाबाहेरच त्यांनी प्रति विधानसभा भरवून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. प्रति विधानसभा भरवल्यामुळे, तालिका अध्यक्षांच्या निर्देशानुसार मार्शल पाठवून ही प्रति विधानसभा बंद करण्यात आली. त्यानंतर, फडणवीसांनी प्रेस रुममध्ये जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारकडून आणीबाणी लादण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, 1975 साली लादलेल्या आणीबाणीतही आमचा आवाज दाबला नाही, यापुढेही आमचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. 

दरम्यान, भाजपाच्या 12 सदस्यांचे निलंबन केल्यानंतर भाजप नेत्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर अन्याय होत असून हे निलंबन रद्द करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानंतर, आज पुन्हा विधिमंडळ सभागृहात भाजपा आमदार आणि सत्ताधारी असा सामना रंगला होता. कदाचित, त्यामुळे राज्यपालांनी हा व्हिडिओ शेअर केला नसेल ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय.   

टॅग्स :मुंबईभगत सिंह कोश्यारीभाजपाविधान भवन