Video : दातृत्व! पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळींनी गरजूंना दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 07:03 PM2020-04-24T19:03:54+5:302020-04-24T19:06:37+5:30
लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्यांनी ही मदत केली आहे.
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी दगडी चाळीत अरुण गवळी आणि त्याची पत्नी आशा गवळी यांनी मदतीचा हात दिला आहे. नागपूर कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याने लॉकडाऊनच्या काळात दगडी चाळीत गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. भायखळा परिसरात अरुण गवळी यांचे निवासस्थान असलेल्या दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दगडी चाळ भागातील ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या गरीब, गरजू व्यक्तींना एक महिन्याचे जीवनावश्यक वस्तूंचा साठा अरुण गवळी यांनी दिला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य माणसांचं जगणं विस्कळीत झालं आहे. रोजंदारी करणारे आणि हातावर पोट असणारे गोरगरीब मंडळी लॉकडाऊनमुळे हातावर हात ठेवून नैराश्याने घरी बसली आहे. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचवेळी दगडी चाळीतील गरजूंना मदत करण्यासाठी अरुण गवळी आणि त्याची पत्नी आशा गवळी यांनी मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्यांनी ही मदत केली आहे. तुरुंगातून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे.
कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 27 फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी आधी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता