Join us  

Video: "जणू काय अमित शहांनीच सहकाराची मुहूर्तमेढ रोवली?" राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:43 PM

या संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचं कौतुक केलं. त्यासोबत, देशात मोदींसारखा दुसरा नेता नाही. मोदींशिवाय मला तरी दुसरा पर्याय दिसत नाही. मोदींच्या नेतृत्त्वात देशात आणि राज्यात विकासकामांना गती मिळाली आहे. तर, अमित शहांच्या नेतृत्त्वात आता सहकार क्षेत्रासाठी चांगले निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. पुण्यातील सहकार कार्यक्रमातील अजित पवारांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला आहे. या संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.

संतप्त कार्यकर्त्याने अजित पवारांच्या बदलेल्या भूमिकेवर मत व्यक्त केले. तसेच, अजित दादा, तुम्हाला अचानक असा कोणता साक्षात्कार झाला, ज्यामुळे तुम्ही मोदी आणि अमित शहांचं एवढं कौतुक करत आहात. सहकाराच्या कार्यक्रमात अमित शहांचंही मोठं कौतुक केलं. पण दादा, सहकार हा राज्याचा विषय येतो. घटनात्मक सूचीनुसार सहकार हा राज्याचा विषय आहे. मात्र, केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्रात सहकार खातं निर्माण केलं आणि अमित शहांना सहकाराचं केंद्रीय मंत्रीपद दिलं. मात्र, दादा मी कालचं तुमचं संपूर्ण भाषणं ऐकलं, या भाषणात सहकाराची मुहूर्तमेढ कुणी रोवली, साधा याचाही उल्लेख करण्यात आला नाही, असे म्हणत राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने अजित पवारांना काही सवाल केले आहेत.

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं मोठं कौतुक केलं. या कौतुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने संताप व्यक्त करत व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवारांना काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या भाषणात सहकाराची मुहूर्तमेढ कोणी रोवली याचा साधा उल्लेखही झाला नाही, जणू काय अमित शहांनीच सहकाराची मुहूर्तमेढ रोवली अशा थाटात सगळ्यांची भाषण होती. धनंजयराव गाडगीळ असतील, वैकंठभाई मेहता असतील, या सर्वांना तत्कालीन महाराष्ट्र सरकारने, काँग्रेसने, यशवंतराव चव्हाणांनी मोठी ताकद दिली होती. वसंत पाटील, शरद पवार यांनीही देखील महाराष्ट्रात सहकार वाढवला रुजवला. 

 नरेंद्र मोदींसारखा दुसरा नेता नाही, असं तुम्ही म्हणता. पण, दादा ज्या नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली, त्या नोटबंदीचे तीन फायदे आम्हाला सांगाल का?, उद्योगपतींचं १० लाख कोटी रुपयांचं कर्ज सरकारने राईटअप ऑफ केलं. पण, शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स वापरला म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करताय १५ हजार कोटी रुपयांसाठी. अहो, १० लाख कोटीचा खड्डा किती मोठा आहे दादा, तुम्ही अर्थ खातं सांभाळता, असे म्हणत कार्यकर्त्याने अजित पवारांना प्रश्न केले आहेत. तसेच, मोदी सरकारने देशातील साखरेवर निर्यातबंदी लादली, देशातील साखर का निर्यात केली नाही, असाही सवाल त्यांनी विचारला.

 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई