मुंबई - पंतप्रधान मोदींविरोधात दिल्लीनंतर आता मुंबईतही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर याठिकाणी कोरोना लशीसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?', असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. काँग्रेसने लावलेल्या या बॅनरविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. भाजपा समर्थकांनी हा बॅनर उतरवरुन खाली रस्त्यावर फेकून दिला होता.
आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे. मुंबईतील विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली असून त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहे. घाटकोपरमध्ये आमदार भाई जगताप, मा.आमदार चरणसिंग सप्रा, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अब्राहम रॉय मणी आणि ब्रिजेश रवि भाटला या पदाधिकाऱ्यांची नाव आहेत. मोदी सरकारवर टीका करणाऱ्या या पोस्टर्सची सध्या चांगलीच चर्चा मुंबईत रंगली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. पण दिल्लीत पोस्टर लावणं अनेकांना महागात देखील पडलं होतं. आता मुंबईत लावलेल्या पोस्टर्सनंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.
भाजपाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी, काँग्रेसने लावलेला हा बॅनर फाडून फेकला. यावेळी, बॅनर खाली उतरवरुन त्या बॅनर पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. मुंबई भाजपाने हा व्हिडिओ ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. तसेच, कोविडच्या संकटात महाराष्ट्राची वेळोवेळी काळजी वाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने चांगलाच दणका दिला, असेही म्हटले आहे. सध्या, हा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
घाटकोपरमध्येही झळकले आहेत बॅनर
देशभरात कोरोनाच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घ्यायलाही प्रचंड उशीर होत असल्याचं त्यामुळं समोर येतंय. महाराष्ट्रात तर 18-44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेकच लागला आहे. या सर्व मु्द्द्यांवरून केंद् सरकारवर विविध आरोप होत आहेत. देशातील नागरिकांना लस नसताना विदेशामध्ये लसींचे डोस का पाठवले असा सवाल मोदींना विचारला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर याठिकाणी अशाप्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे
दिल्लीत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई
कोरोना लसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने येत असल्याचं या पोस्टर्सवरून आणि काँग्रेसनं घेतलेल्या पवित्र्यावरून दिसून येत आहे. कारण सुरुवातीला दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्सना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहिमेचं स्वरुप दिलं होतं. दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्सनंतर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी तब्बल 21 गुन्हे दाखल केले. 12 जणांना अटक करण्यात आली तसेच शेकडो पोस्टरही जप्त केले. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि इतर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.