Join us

Video: 'मोदीसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज अन् डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 10:45 AM

डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजपा सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले. मात्र सध्या सोशल मीडियात फिरणाऱ्या सुजय विखेंचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे भाजपाची गोची झाली आहे. 

डॉ. सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजपा सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहे. सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये असतानाचा हा व्हिडीओ आहे. त्यात ते म्हणतात की, 36 महिन्यात गुजरातमध्ये 3300 कोटी रुपयांचे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा केला जाऊ शकतो. तर जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवछत्रपतींचे स्मारक आणि भूमिपुजन करुनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप का उभारण्यात आले नाही असा सवाल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करताना पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी स्वत:बद्दलच पुढील 20 वर्षांचं राजकीय भाकीत वर्तवलं होतं. आगामी 20 वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मीच खासदार राहणार आहे. तुमची कामे करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या, असे वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. सुजय विखे आपल्या भाषणावरुन आणि हरकतीवरुन नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावरुनही नेहमीच त्यांना ट्रोल करण्यात येते. काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत, इंदुरीकर महाराजांना भाजपाची टोपी (गमझा) घालण्याचा प्रयत्न सुजय यांनी केला होता. मात्र, महाराजांनी सुजय यांचा हात पकडत मी कुठल्याही राजकीय पक्षाचं बॅनर लावून घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, सुजय यांना रोखलं. या घटनेची चांगलीच चर्चा अहमदनगर जिल्ह्यात रंगली होती. तर, या घटनेवरुन नेटीझन्सनंही सुजय यांना टीकेचं धनी बनवलं होतं. 

दरम्यान नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले होते की, ‘तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जात जा़ साकळाई योजना फक्त सुजय विखेच करू शकतो. अन्य कोणाचे ते काम नाही’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. यावरुनही सुजय विखे पाटील चांगलेच चर्चेत आले होते. 

टॅग्स :सुजय विखेनरेंद्र मोदीछत्रपती शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरभाजपा