मुंबई - राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर आता भाजपाचं पुढील लक्ष्य मुंबई महापालिकेकडे लागलं आहे. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. परंतु मागच्यावेळी शिवसेना-भाजपा यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यात शिवसेनेला काठावरचं बहुमत मिळालं. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपानं तगडं आव्हान निर्माण केले आहे.
मुंबईतील खड्डे यावरून सातत्याने भाजपानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यात आता व्यंगात्मक पद्धतीने भाजपा मुंबईने ट्विटरवरून पुष्पा या सिनेमातील गाण्याद्वारे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यात पुष्पा या कार्टूनच्या माध्यमातून जर पुष्पाचं मुंबईत शुटींग झालं असतं तर असं सांगत आदित्य ठाकरेंना टॅग करण्यात आले आहे. या व्हिडिओत पुष्मा सिनेमातील सुप्रसिद्ध गाणं तेरी झलक माध्यमातून मुंबईतील खड्डे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० हून अधिक आमदार गेल्यानं विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ अवघ्या १५ जागांवर आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेला न मिळण्याची नामुष्की ओढावली आहे. केवळ आमदारच नाही तर अनेक खासदारही एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
येत्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासारख्या अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला भाजपाचं तगडं आव्हान आहे. त्यात एकनाथ शिंदेसारख्या नेता भाजपाला मिळाल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात मुंबईतील सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर यासारखे आमदारही सहभागी झाले आहेत. अलीकडेच शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्याचं सर्वात मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. कारण भाजपा यंदा महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.