Video : 'लेकरू 500 रुपये खर्चून परीक्षेला जातंय, तिकडं माय 150 रु रोजानं शेतात जातीय'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:55 AM2021-09-25T10:55:29+5:302021-09-25T10:56:21+5:30
Video : राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. तर, आमदार श्वेता महाले यांनीही ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. त्याचवेळी शुक्रवारी रात्री परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तर, अनेक परीक्षार्थींनी गाव सोडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली होती. काहीजण जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचलेही होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होऊन त्यांना परतावे लागले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा खर्च फुकटच वाया गेला आहे. सोशल मीडियातून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांच्या ट्विटरवरही अनेकांनी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर, गरीबाचं लेकरू 500 रुपये घेऊन परीक्षाला जातंय, तिकडं माय 150 रुपये रोजानं शेतात जाती, असे म्हणत परीक्षा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आणखी एखादा विद्यार्थी फाशी घेऊन मारावा अस वाटत आहे का तुम्हाला..गरीब मुलांची परिस्थिती कधी कळणार आहे तुम्हला??? pic.twitter.com/aI2PAdjBQl
— Amit Mokashe (@MokasheAmit) September 24, 2021
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले, गट-क आणि गट-ड अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली होती. या जागा भरत असताना त्यासाठी परीक्षा घेण्याचे काम बाह्य संस्थेला देण्यात आले होते. या परीक्षेसाठी अंदाजे ८ लाख परीक्षार्थींनी नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही देण्यात आले होते. मात्र, या ज्ञासा संस्थेने आपल्याला परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल, असे कारण पुढे केल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.
सुधारीत तारीख लवकरच
दरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपल्याला याबाबतची विस्तृत माहिती संकेत स्थळावर मिळेल. त्याचप्रमाणे जिल्हा केंद्रावर देखील आपल्याला माहिती मिळू शकेल. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.