Join us

Video : 'ST कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, प्रश्न मार्गी लावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 3:45 PM

भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही.

ठळक मुद्देएक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो

मुंबई - राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे भाजपा नेते संपाला पाठिंबा देत संपाच्या ठिकाणी जाऊन आपला पाठिंबा देत आहेत. आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला. त्यावेळी, मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला. 

भाजप सरकारमध्ये दिवाकर रावते हे कोणाच्या मांडीला मांडी लावू बसले होते. मुख्यमंत्री भाजपचे असतानाही परिवहन महामंडळ शिवसेनेकडेच होतं, त्यावेळी का आग्रही मागणी केली नाही. शिवसेनेची एसटीमध्ये कामगार संघटना आहे, त्यांनीही का बोलले नाही. उगाच, भाजपकडे बोट दाखविण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तसेच, विलिनीकरणाला वेळ लागणार आहे, मग एक दिवसांच विशेष अधिवेशन बोलवा. उद्या किंवा परवा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार येतो, एकमुखी पाठिंबा देतो, एक आमदार विरोध करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी मुंबईतच हे अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असेही राणे म्हणाले.  एसटी महामंडळाचे आवाहन

कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.  

टॅग्स :नीतेश राणे मुंबईएसटी संपशिवसेना