मुंबई : वाढीव वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतानाच जूनमध्ये ग्राहकांकडून ४८ हजार तक्रारी आल्या आहेत. बहुतेक तक्रारींचे निराकरण झाले आहे. सुमारे २ हजार १११ तक्रारी पडताळणी व निराकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. थकबाकी २५० कोटी रुपयांवरून ७५० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. लॉकडाऊन सुरू झाला त्या काळात सुमारे २.५ लाख ग्राहकांनी थकबाकी भरलेली नव्हती. ही संख्या मे २०२० या कालावधीत ७.७ लाखांनी वाढली आहे. ग्राहकांना बिले स्पष्ट करून सांगण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर सुमारे ३.५ लाख ग्राहकांनी थकबाकी भरली आहे. सुमारे ६.७ लाख ग्राहकांकडे बिलांची थकबाकी आहे, अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या परिषदेत देण्यात आली.ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर २५ व्हर्च्युअल हेल्प डेस्क्स आहेत. यांवरून व्हिडीओ कॉल्स केले जातात, असेही परिषदेत सांगण्यात आले.मार्च २० ते मे २० दरम्यान पाठविलेली बिले ही त्यापूर्वीच्या ३ महिन्यांच्या म्हणजेच डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळातील कमी वीजवापराच्या हिवाळी महिन्याच्या सरासरी वापराच्या आधारे तयार केली होती. लॉकडाऊनच्या काळात तयार करण्यात आलेली ही बिले प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत कमी होती. उन्हाळा तसेच घरून काम करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे प्रत्यक्ष वीजवापर अधिक होता. घरून काम करण्यामुळे हिवाळ्यातील वीजवापर व प्रत्यक्ष वीजवापरातील फरक सुमारे २० टक्क्यांनी वाढला.
वीजग्राहक सेवेसाठी आता व्हिडीओ कॉलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:39 AM