ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.7- चित्रे, छायानृत्ये किंवा जत्रेमध्ये मॅजिक लॅंटर्नमध्ये चित्रे पाहण्याची सवय असलेल्या भारतीय लोकांच्या आयुष्यात 7 जुलै 1896 या दिवसामुळे मोठी क्रांती झाली. मुंबईच्या वॅटसन एस्प्लांड हॉटेलमध्ये फ्रेंच फिल्ममेकर ल्युमिएर बंधुंनी याच दिवशी काही चलतचित्राच्या फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
ऑगस्ट मेरी लुईस निकोलस आणि लुईस जीन ल्युमिएर हे दोघे बंधु चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या काही लोकांमधील एक म्हणून ओळखले जातात. लिओन बाऊलेने तयार केलेले सिनेमॅटोग्राफर यंत्र त्यांनी त्याच्या सर्व हक्कांसह विकत घेतले होते. या यंत्राच्या साहाय्याने त्या दोघांनी काही सेकंदांच्या फिल्म्स तयार करण्याचा सपाटा लावला. 26 डिसेंबर 1895 रोजी त्यांनी पॅरिसमध्ये पहिला चलतचित्रफित दाखवण्याचा तिकीट लावून पहिला कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी पॅरिसबाहेर जाऊन ब्रुसेल्समध्ये कार्यक्रम केला, मग मुंबई, मॉंट्रिआल, न्यू यॉर्क, ब्युनॉस आयर्स येथे त्यांनी हे कार्यक्रम केले.
(ल्युमिएर बंधुंनी दिलेली जाहिरात)
इंग्रजी सत्ता असलेल्या भारतात येऊन मुंबईत अशा चलतचित्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही भारताच्या इतिहासातील एक मोठी घटनाच मानावी लागेल. कारण पॅरिसला झालेल्या पहिल्या कार्यक्रमानंतर एका वर्षाच्या आत हा कार्यक्रम मुंबईत घेण्यात आला. मुंबईत आल्यावर त्यांनी "बॉम्बे गॅझेट" आणि "टाइम्स ऑफ इंडिया"मध्ये कार्यक्रमाची जाहिरातही दिली. "द मार्वल ऑफ द सेंच्युरी", "द वंडर ऑफ द वर्ल्ड" अशा दोन ओळींमध्ये या जाहिरातीची सुरुवात होते. ल्युमिरे बंधुंच्या सिनेमॅटोग्राफमध्ये हलणारी चित्रे ते ही लाइफसाइजमध्ये पाहण्याची संधी असेही त्यामध्ये लिहिण्यात आले. "वॅटसन हॉटेलमध्ये एन्ट्री ऑफ सिनेमॅटोग्राफ","अरायवल ऑफ अ ट्रेन", " द सी बाथ", "द डिमॉलिशन" , लीविंग द फॅक्टरी, लेडिज अॅंड सोल्जर्स ऑन द व्हील या चित्रफिती दाखवण्यात येणार असल्याच त्यात नमूद करण्यात आले होते. तसेच 7 जुलै रोजी संध्याकाळी सहा, सात, नऊ आणि दहा वाजता त्याचे प्रदर्शन होईल असे सांगून सर्वात शेवटी तिकिटाचा दर एक रुपया असे या लिहिले होते.
अरायवल ऑफ ट्रेन या फितीमधील रेल्वेला पाहून त्यादिवशी जमलेल्या दर्शकांची घाबरगुंडी उडाल्याचेही सांगण्यात येते. फिल्ममधील रेल्वे खरीखुरी वाटून काही लोक खुर्च्यांवर चढून बसले तर महिला घाबरुन खुर्च्यांमागे लपल्या. या कार्यक्रमाचे वृत्तांकन दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. साधारण मिनिटभर लांबीच्या या सहा चित्रफिती दर्शकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या. काहीतरी अद्भूत नवे पाहण्याची संधी आपल्याला मिळाली असा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर पसरला होता. 7 जुलैनंतर 9 तारखेस, त्यानंतर 10, 21, 23 ,24 असे हे कार्यक्रम पुन्हा करण्यात आले. त्यानंतर 27 जुलै ते 15 ऑगस्ट असे दररोज संध्याकाळी हा कार्यक्रम दाखवण्यात य़ेत होता. या सर्व कार्यक्रमांना तुफान प्रसिद्धी मिळत गेली.
वॅटसन हॉटेल बद्दलः ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम या चित्रफिती दाखवण्याचा कार्यक्रम केला ते वॅटसन हॉटेल मुंबईतील सर्वात जुन्या हॉटेलांपैकी एक आहे. 1869मध्ये बांधून पुर्ण झालेले हॉटेल मुंबईतील काळाघोडा परिसरामध्ये आहे. ख्यातनाम लेखक मार्क ट्वेन तसेच पाकिस्तानचे संस्थपक मोहम्मद अली जिना यांनी येथे वास्तव्य केले असून जिना येथे पूल खेळण्यास येत असत अशीही माहिती मिळते.
(व्हिडियो सौजन्य- युट्युब)