व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर सुरक्षितच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:25 AM2020-09-07T00:25:11+5:302020-09-07T00:25:25+5:30

प्रश्न - लॉकडाऊनच्या काळात आॅनलाइन कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर किती वाढला आणि भविष्यात त्यात आणखी वाढ होईल का ? उत्तर ...

Video conferencing platforms must be used safely | व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर सुरक्षितच हवा

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर सुरक्षितच हवा

Next

प्रश्न - लॉकडाऊनच्या काळात आॅनलाइन कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर किती वाढला आणि भविष्यात त्यात आणखी वाढ होईल का ?
उत्तर - आप्तस्वकीयांचा वाढदिवस साजरा करण्यापासून ते कॉर्पोरेट कंपन्यांच्या गोपनीय बैठकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी या प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढला आहे. कोरोनापूर्व काळात जगभरात दररोज १० कोटी ग्राहक झूमचा वापर करायचे. ती संख्या आता ३० कोटींवर झेपावली आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले तरी या प्लॅटफॉर्मचा वापर कमी होण्याची शक्यता धूसर आहे. ही सॉफ्टवेअर क्लाऊडबेस असल्यामुळे अल्पावधीत त्यांची क्षमता वाढ सहज शक्य होते.

प्रश्न - तुम्हाला ४० मिनिटांपर्यंत विनामूल्य सेवा परवडते कशी, या कंपन्यांच्या महसुलाचे मॉडेल नेमके असे असते ?
उत्तर - महसुलाचे मॉडेल हे सबस्क्रिप्शनवर आधारित असते. ४० मिनिटांपेक्षा जास्त वापर करणाऱ्यांकडून लायसन्स फी आकारली जाते. त्याशिवाय मोठ्या व्हीसींसाठी झूम रूम, डिजिटल सायनेजेस, झूम आॅडिओ, व्हिडीओ या सेवांच्या माध्यमातूनही महसूल मिळतो. त्यामुळे नजीकच्या भविष्यातही ४० मिनिटांपर्यंत विनामूल्य सेवा बंद होणार नाही. अन्य नामांकित प्लॅटफॉर्मही सर्वसाधारणपणे याच धर्तीवर कार्यरत आहेत. झूमकडे ग्राहकांच्या ईमेल आयडीव्यतिरिक्त अन्य वैयक्तिक माहिती नसते. त्यामुळे ती विकून पैसे कमावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्न - आॅनलाइन शिक्षण देणाºया शाळांसाठी ४० मिनिटांपर्यंतच्या विनामूल्य सेवेची मर्यादा झूमने काढून टाकली आहे. ती सवलत कधीपर्यंत असेल ?
उत्तर - सामाजिक दृृष्टिकोनातून झूमने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा देशाच्या कानाकोपाºयातील अनेक शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांना होत आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आता हेच अ‍ॅप वापरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शाळा नियमित सुरू होत नाहीत तोपर्यंत तरी ही सवलत बंद केली जाणार नाही.

प्रश्न - डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे का ?
उत्तर - वाढत्या डिजिटल वापरामुळे सायबर गुन्हे सहापटीने वाढले आहेत. त्यामुळे धोका निश्चितच आहे. झूमचा विस्तार करताना अनावधानाने चीन येथील डेटा सेंटरचे जिओ फेन्सिंग झाले नव्हते हे मी प्रांजळपणे कबूल करतो. मात्र, त्यामुळे झूमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतानाच आम्ही चीनला डेटा विकतो अशी आवई उठवली गेली. त्यामुळे केवळ आमच्यासारख्या कंपन्याच नाही तर सर्वसामान्य ग्राहकांचा या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित वावर अत्यावश्यक आहे.

प्रश्न - या प्लॅटफॉर्मचा वापर करताना ग्राहकांनी किमान कोणती काळजी घ्यायला हवी ?
उत्तर - सुरक्षेसाठी मीटिंग लॉक करणे, एखाद्या अनावश्यक पार्टिसिपेंटला बाहेर काढणे आदी अनेक नवीन फीचर्स ठळक जागी दिसतील अशा पद्धतीने लॉन्च करण्यात आले आहेत. तुम्ही कोणत्या डेटा सेंटर्सशी जोडले आहात हेदेखील कळते आणि ते बदलण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. याशिवाय एखादे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना आपण अनावधानाने आपल्याकडील सर्व माहितीचा अ‍ॅक्सेस दिला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनसाठी एकच यूजर नेम आणि पासवर्ड ठेवू नये. त्यामुळे एक अ‍ॅप हॅक झाले तरी अन्य ठिकाणचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. मीटिंग आयडी आणि पासवर्ड व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुळीच शेअर करू नये. प्रत्येकाने काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने अ‍ॅपचा वापर केला तर संभाव्य धोके टाळणे सहज शक्य आहे.

मुंबई : कोरोना संक्रमण काळातील ‘वर्क फ्रॉम होम कल्चर’मुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर प्रचंड वाढला आहे. त्याचे जसे फायदे आहेत, तसे धोकेही आहेत. हा प्लॅटफॉर्म सर्वसामान्यांसाठी भविष्यातही विनामूल्य उपलब्ध असेल का, त्यांच्या फायदा-तोट्याचे गणित नेमके असे असते, आपली वैयक्तिक माहिती ते अन्य कुणाला विकत तर नाही ना याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्वाधिक वापर असलेल्या झूम व्हिडीओ कम्युनिकेशन्सचे भारतातील प्रमुख समीर राजे यांच्याशी केलेली ही बातचीत.

Web Title: Video conferencing platforms must be used safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.