Video : देवेंद्र फडणवीसांना जशास तसं उत्तर, शिवसेनेचीही बाळासाहेबांना व्हिडीओतूनच आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 11:26 AM2019-11-17T11:26:50+5:302019-11-17T11:52:54+5:30
मला बाकीच्यांना काय वाटत असेल, नसेल, विरोधकांना असं वाटत असेल आता शिवसेनेचं काय होणार
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिलाय. आता, शिवसेनेकडूनही बाळासाहेबांना व्हिडीओतूनच आदरांजली वाहण्यात आली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही भाग दिसून येतो. ज्यामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माजी मुख्यमंत्र्यांनी अलगदपणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवणच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी करून दिल्याचं दिसून आलं. आता, शिवसेनेनंही फडणवीसांच्या ट्विटला हेरूनच उद्धव ठाकरेंच्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण आणि भावना आहेत. त्या व्हिडिओतून मी वाट्टेल ते करीन, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करेन. विधानसभेवर भगवा फडकवीन, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओला शिवेसेनेनं जशास तसं उत्तर दिलंय, असंच म्हणावं लागेल.
''मला बाकीच्यांना काय वाटत असेल, नसेल, विरोधकांना असं वाटत असेल आता शिवसेनेचं काय होणार. त्यांना मला दाखवायचंय शिवसेना काय करुन दाखवते. ज्या माणसाकडे कुठलंही मोठं भांडवलं नव्हत. त्यांनी केवळ अग्रलेख, व्यंगचित्र आणि महाराष्ट्र पिंजून दिलेली भाषणं एवढं सारं धारण केलं. जगाच्या पाठीवर असा एकही व्यंगचित्रकार नाही, ज्याने आपल्या कुंचल्याच्या ताकदीने वाघ निर्माण केलेत, शिवसैनिक हे केवळ घोषणा देण्यापुरते वाघ नाहीत, असे उद्गार असलेल्या भाषणाचा व्हिडीओ शिवसेनेनं ट्विट केला आहे.
''मी जाणारंय, जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलंयं त्यासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकलेलंय. काय वाट्टल ते मी करीन, दिवस-रात्र मेहनत करीन, आकाश-पातळ एक करील. काय करायचंय ती एकही गोष्ट शिल्लक ठेवणार नाही. पण, मी बाळासाहेबांची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, ही शपथ आणि वचन मी त्यांना दिलंय, असे उद्धव ठाकरे या व्हिडीओतील भाषणात म्हणत आहेत. सर्वसामान्य मराठी माणूस, हिंदू आणि दिन-दुबळा हा शिवसेनेकडे आधार म्हणून बघतोय. शिवसेना हा पक्ष निवडणूक लढविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काढला नाही. अन्यायावरती वार करण्यासाठी हा पक्ष आहे. विधानसभेवर भगवा फडकवल्यावरही ही जाणीव राहणार... अरे बाळासाहेबांनी हे पाहायला पाहिजे होतं, पण ते बघत राहणार आपल्या सर्वांच्या डोळ्यातून बघत राहणार.. आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच,'' असा आशय उद्धव ठाकरेंच भाषण असलेल्या या व्हिडिओत आहे.
पाहा व्हिडीओ -
"जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या पाठीवर असा दुसरा एकही व्यंगचित्रकार नाही की ज्याने आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने सर्वसामान्यांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) November 17, 2019
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! pic.twitter.com/aIzbAnwilY