VIDEO- रेल्वे स्टेशनवर 'ही' कुत्री रोज रात्री पाहत असते कुणाची तरी वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 11:07 AM2018-02-23T11:07:46+5:302018-02-23T11:26:12+5:30
कांजुरमार्ग स्टेशनवर एक कुत्री कुणाची तरी वाट पाहताना दिसते आहे.
मुंबई- माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र पाळीव प्राण्याला मानलं जातं. तसंच प्रामाणिकपणाच्या बाबतीत कुत्र्याला विशेष महत्त्व दिलं जातं. याच एक उदाहरण सध्या कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतं आहे. कांजुरमार्ग स्टेशनवर एक कुत्री कुणाची तरी वाट पाहताना दिसते आहे. रोजच्या ठरलेल्या वेळेत ती कुत्री कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर येते व पुन्हा जाते. तिच्या या वागण्यामुळे स्टेशनवरील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे. दररोज ही कुत्री ट्रेनच्या वेळेत येते व ट्रेन सुटायच्या आधी पहिल्या लेडीज डब्याजवळ बसून कुणाची तरी वाट पाहते.
रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या या कुत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रोज रात्री 11 वाजेनंतर कांजुरमार्ग स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट ही कुत्री पाहताना व्हिडीओत दिसतं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका ट्विटर युजरने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना ट्विट केलं आणि या प्रकरणावर तोडगा काढण्याची मागणी केली. कुत्रीला कुणी सोडलं आहे, ती हरवली आहे की रस्ता चुकली आहे, याबद्दल लोकांना जाणून घ्यायचं आहे.
या कुत्रीचं रोज रात्री कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालं आहे. हे व्हायरल फुटेज 2 जानेवारीचं आहे. काही प्रवाशांनीही कुत्रीची रोजची येण्याची वेळ पाहिली असून तिला चार पिल्लं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
डोंबिवलीचे रहिवासी समीर थोरात यांनी मंगळवारी फेसबुकवर या कुत्रीचा व्हिडी ओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 22 हजार लोकांनी शेअर केलं आहे. प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली की ही कुत्री ट्रेनच्या डब्यात वाकून पाहते, ट्रेनमधून कुणी उतरताना दिसलं नाही तर ती ट्रेनच्या मागे धावते, असं त्या व्हिडीओत दिसतं आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर रोज येणारी कुत्री चर्चेचा विषय बनली आहे.