Join us

Video : एकच वादा, अजित दादा; शपथविधी तांबेंचा अन् घोषणा अजित पवारांच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 4:08 PM

तांबे समर्थकांच्या या घोषणाबाजीतच बाजूलाच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी एकच दादा, अजित दादा... अशीही घोषणाबाजी केली.

राज्यात नुकतेच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी सोहळा विधिमंडळात पार पडला. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला सर्वच आमदारांचे समर्थक आणि कार्यकर्ते काही संख्येने उपस्थित होते. नाशिक मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजित ताबेंच्या शपथ घेतेवेळी समर्थकांनी घोषणाबाजी केल्याचं सभागृहात पाहायला मिळालं, 

विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी, राज्यात सर्वात चर्चेत राहिलेल्या सत्यजित तांबे यांच्या शपथविधीवेळी समर्थकांनी एकच वादा, सत्यजित दादा... अशी घोषणाबाजी केली. 

तांबे समर्थकांच्या या घोषणाबाजीतच बाजूलाच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी एकच दादा, अजित दादा... अशीही घोषणाबाजी केली. त्यामुळे, सर्वांनाच आश्चर्य वाटले. तसेच, सभागृहातील या घोषणाबाजीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले होते. विशेष म्हणजे अजित पवार हेही या शपथविधी सोहळ्याला स्टेजवर उपस्थित होते.  

अजित पवारांकडून सत्यजित तांबेंच्या विजयाचा विश्वास 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसला कानपिचक्या दिल्या होत्या. “काँग्रेसने जर सत्यजीत तांबेंना उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं होतं. तसेच सत्यजीत तांबेंनी नाईलाजास्तव अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. सत्यजीत तांबेंचे वडील, आजोबा यांच्यासह आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे माझा अंदाज आहे की, सत्यजीत तांबे आता आघाडीवर आहेत आणि तेच निवडून येतील. निवडून आल्यावर ते योग्य तो निर्णय घेतील.”, असा विश्वासही अजित पवार यांनी निकालापूर्वीच व्यक्त केला होता. 

टॅग्स :सत्यजित तांबेअजित पवारमुंबईआमदारकाँग्रेस