मुंबई-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षातील सर्वात मोठ्या बंडाळीनंतर शिवसैनिकांची मोट बांधून धीर देण्याचं काम करत आहेत. पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा उद्धव ठाकरे यांनी लावलेला असताना दुसरीकडे बंडखोर आमदारही आपली खदखद व्यक्त करत आहेत. आज गुवाहटीमध्ये असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार जेव्हा आमदारांनी उद्धव ठाकरेंसोबत केली तेव्हा अधिकाऱ्यांकडून आकडेवारी मागवून घेण्यात आली होती. यात अधिकाऱ्यांनी सादर केलेले आकडे आणि आम्ही दिलेले आकडे यात मोठी तफावत होती. ती पाहून मुख्यमंत्री देखील अचंबित झाले होते, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
कोरेगाव जिल्हा सातारा येथील शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे यांनी आज एका व्हिडिओ मेसेजमधून आज इतकी आक्रमक भूमिका का घ्यावी लागली याची माहिती दिली आहे. "सर्व आमदारांची वर्षा निवास्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सर्व अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आम्हाला आमच्या मतदार संघात किती निधी दिला याचे आकडे मागितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चुकीचे आकडे दिले. आम्ही जे आकडे दिले ते पाहून मुख्यमंत्री देखील अचंबित झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर सांगितलं की तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला. पण त्यात काहीच बदल झाला नाही. शिवसेनेच्या आमदारांना ५० ते ६० कोटींचा निधी दिला जात होता. पण आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाडले त्यांना दुप्पट, तिप्पट निधी दिला जात होता", असा आरोप महेश शिंदे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीकडून संपवण्याचा प्रयत्न"आम्हाला आमच्या मतदार संघातील कोणत्याही कार्यक्रमांना बोलावलं जात नव्हतं. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की यात सुधारणा पाहायला मिळेल. त्यांनी अनेक गोष्टींना स्टे देखील दिला. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आदेश मानले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवून त्यांनी आमच्या मतदार संघात राष्ट्रवादीनं केलेल्या कामांची उदघाटनं केली", असं महेश शिंदे म्हणाले.