मुंबई - दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. मात्र, यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये काश्मीर मुक्त करण्याचे फलक झळकल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे फ्री काश्मीर फलक राजकीय चर्चेचा विषय बनला. यावर आता, तो बोर्ड झळकवणाऱ्या मुलीनेच स्पष्टीकरण दिलंय. मेहक मिर्झा प्रभू असं या मुलीचे नाव असून तीने फेसबुकवरुन हे स्पष्टीकरण दिलं.
जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. या आंदोलनामध्ये आयआयटी बॉम्बे, टाटा इन्स्टीट्यूटसारख्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फ्री काश्मीरच्या फलकावरुन आंदोलनावर प्रश्न उभारले, तसेच कारवाईची मागणीही केली होती. मात्र, हे फ्री काश्मीरचे फलक हे काश्मीरमधील परिस्थितीला उद्देशून होते, तेथील इंटरनेट सेवा, संचारबंदी अन् सरकारचं नियंत्रण हटविण्यासाठी होते, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलंय. त्यानंतर, आता खुद्द फलक झळकवणाऱ्या मुलीनेच फेसबुक व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
मेहक मिर्झा प्रभू असं या तरुणीचं नाव असून ती स्टोरीटेलर असल्याचं तिन म्हटलंय. मेहकने आपण जे पोस्टर घेऊन उभे होतो ते तिथेच पडलेलं होतं असा दावा तिने व्हिडीओत केला आहे. “मी मंगळवारी 6 जानेवारी रोजी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे गेटवे ऑफ इंडियावर निषेध आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी मला तिथे एक खाली पडलेलं पोस्टर सापडलं, ज्यावर स्वतंत्र काश्मीर लिहिण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल सेवा सुरळीत व्हावी या एकमेव इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतलं. तेथील लोकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे.'' म्हणून मी ते पोस्टर झळकावलं, असं मेहकने स्पष्ट केलंय.