मुंबई - शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. कंगना बुधवारी मुंबईत आल्यानंतर तिने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, तिच्या कार्यालयावरील कारवाईचा संताप व्यक्त केला. शिवसेना-कंगना वाद जोर धरत असतानाच रामदास आठवले कंगनाच्या भेटीला तिच्या घरी गेले. मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आठवलेंनी तिच्याशी चर्चा केली. त्यावेळी, माझं सौभ्याग्य आहे की, आपण माझ्या घरी आलात, आपले आशीर्वाद हवेत, असे कंगनानाने म्हटले आहे.
राजकारणात रुची नसली तरीही समाज एकत्र राहण्यामध्ये असल्याचे कंगनाने आठवलेंना सांगितले. कंगना तिच्या आगामी चित्रपटात एका दलित मुलीची भूमिका साकारत आहे. जातीपातीची सिस्टिम नष्ट व्हावी असे या चित्रपटाचे कथानक आहे, असे आठवले म्हणाले. जोपर्यंत चित्रपटांमध्ये काम करत आहे तोपर्यंत कंगनाला राजकारणात रुची नाही, असे कंगनाने स्पष्ट सांगितल्याचे आठवले म्हणाले. तसेच पुढे कंगना भाजपा किंवा आरपीआयमध्ये आल्यास तिचे स्वागत करू, असेही आठवलेंनी सांगितले.
मोदी सरकारने ह्रदय जिंकले
दरम्य़ान, कंगनाच्या आईने आज मोठी घोषणा केली आहे. कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊन आणि हिमाचलच्या जयराम ठाकूर सरकारनेही सुरक्षा पुरविल्याने आम्ही भाजपाचे झालो आहोत, असे वक्तव्य कंगनाची आई आशा राणौत यांनी केले आहे. कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. तेव्हा आशा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले. यावर कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. ''आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत.''
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे पणजोबा सरजू सिंह गोपालपूरचे आमदार होते. त्या आधीपासून त्यांचे कुटुंबीय काँग्रेसी विचारधारेचे समर्थ राहिले आहे. मात्र, कंगना गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करते. यामुळे कंगना पुढील काळात भाजपात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तिच्या आईनेही आज तसेच संकेत दिले आहेत. शांता कुमार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून कंगनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
कंगना २ कोटींचा दावा ठोकणार
अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, कंगनाच बोलवता धनी वेगळाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना असल्याचं कोल्हे म्हणाले. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला नाहक महत्त्व दिलं जातं असल्याचं कोल्हे म्हणाले.