Join us

मुंबईत आता इस्रायलच्या मदतीने सुरू होणार व्हिडीओ इन्टिलिजन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:42 AM

सुरक्षा बळकट होणार; आणखी ४,५०० कॅमेरे लागणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे एक लाख नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेषत: आता रुग्णालये सक्षम करण्यासाठी काम सुरू आहे. समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी ९० जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. मुंबईत ५ हजार ४९२ कॅमेरे लागले असून, ते नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. आणखी ४ हजार ५०० कॅमेरे लागणार असून, इस्रायलच्या मदतीने व्हिडीओ इन्टिलिजन्ससाठी काम सुरू आहे. परिणामी, मुंबईची सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट होणार आहे, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.मुंबई महापालिकेच्या ४०२ शाळांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार आहे. खासगी शाळा मात्र याबाबत जागरूक नाहीत. आम्ही आमच्या संकेतस्थळावर आराखड्याबाबत माहिती अपलोड केली आहे. शाळांचा आराखडा सर्वांसाठी खुला असणे महत्त्वाचे असून, आपत्कालीन व्यवस्थापनात जोपर्यंत नागरिकांचा सहभाग दिसत नाही, तोपर्यंत यात १०० टक्के परिपूर्णता येणार नाही, असे सांगत महेश नार्वेकर म्हणाले की, आपत्कालीन मदतसेवा क्रमांक १९१६ आहे. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित आहे. पर्यायी संदेशवहन व्यवस्था म्हणून हॅम रेडिओ तयार आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत. मुंबईत पडत असलेल्या पावसाची १५ मिनिटागणिक माहिती दिली जात आहे. यासाठी ६० स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापैकी कोणत्याही केंद्रावर १५ मिनिटांत २० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याची सूचना ही केंद्रे अलार्मद्वारे देतात. या ६० केंद्रांचा अहवाल आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ आणि अ‍ॅप उपलब्ध आहे. नौदलाची ८ पथके सज्ज असून, पाणबुड्यांच्या दोन पथकांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या सज्ज आहेत. प्रत्येक तुकडीत ४५ इतके मनुष्यबळ आहे. आपत्कालीन दुर्घटनेदरम्यान नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात एकत्र होण्यासाठी १२७ महापालिकेच्या शाळा सज्ज आहेत.मान्सूनजन्य आजारांकरिता अतिरिक्त खाटामुंबई महापालिकेच्या २४ विभागांत आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. विभागीय नियंत्रण कक्षात आवश्यक मनुष्यबळासह स्वयंसेवी संस्थांचे कामगार, साधन सामुग्री, वाहने, कंत्राटी कामगार तैनात आहेत.प्रत्येक विभागाचा पावसाळी कालावधी विषयक आपत्कालीन आराखडा व सुनिश्चित कार्यपद्धती अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मान्सूनजन्य आजारांकरिता २ हजार ९०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकामार्फत प्रशिक्षण घेतलेले २०० सुरक्षा रक्षक, २० वैद्यकीय अधिकारी, १२ अग्निशमन अधिकारी यांचे पथक महापालिकेने तयार केले आहे. या पथकास पावसाळ्यात सज्ज राहण्याची सूचना दिल्या जातात.

टॅग्स :इस्रायलमुंबई महानगरपालिका