Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:30 IST2024-05-13T17:29:55+5:302024-05-13T17:30:30+5:30
अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त
Mumbai Rains ( Marathi News ) :मुंबई शहरासह उपनगरांमध्ये वादळी वारा आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वाऱ्यामुळे शहरात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं असून या होर्डिंगखाली पंपावरील चार ते पाच वाहने अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि परिसरात वादळी वारा सुरू झाल्यानंतर घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपाच्या शेजारीच असणारं लोखंडी होर्डिंग पंपावर कोसळलं. या होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चार ते पाच गाड्या आणि पावसापासून बचावासाठी आश्रय घेण्यास आलेले काही नागरिक अडकल्याचं सांगितलं जात आहे. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान, वडाळ्यात पार्किंग टॉवर वाहनांवर कोसळल्यानेही काही जण जखमी झाल्याचे समजते.
जोगेश्वरीतील मेघवाडी नाका येथील शाखेजवळ झाड कोसळून अपघात
जोगेश्वरी इथं एक रिक्षाचालक प्रवाशांना सोडून जात होता. सदर रिक्षावर झाड कोसळल्याने या दुर्घटनेत रिक्षाचालक गंभीररित्या जखमी झाला आहे.