Video: झाडी, डोंगारफेम आमदारांस चंद्रकात पाटलांकडून पाठीवर कौतुकाची थाप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:32 PM2022-07-02T22:32:16+5:302022-07-02T22:34:01+5:30
यावेळी, काय झाडी, काय डोंगारफेम आमदारांना पाहून चंद्रकांत पाटील यांनीही आनंद झाल्याचं दिसून आलं.
मुंबई - राज्यातील राजकीय भूकंपानंतर सत्तांतर झाल्याचं देशाने पाहिलं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, दोन दिवसांनी आणि महाराष्ट्र सोडल्यापासून तब्बल 12 दिवसांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईत पाऊल ठेवले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमवेत विमानात आणि बसमधून आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेते हजर होते. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी या आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी, काय झाडी, काय डोंगारफेम आमदारांना पाहून चंद्रकांत पाटील यांनीही आनंद झाल्याचं दिसून आलं.
एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या बंडखोर 50 आमदारांची काळजी घेत आहेत. म्हणूनच, 50 आमदारांना मुंबईला आणण्यासाठी ते स्वत: गोव्याला गेले होते. एकनाथ शिंदेंचा आमदारांसमवेत बसमधील एक व्हिडिओ समोर आला होता. आता, ह्या सर्व आमदारांचे मुंबईत आगमन झाले असून ते ताज प्रेसिडेंट हॉटेलवर उतरले आहेत. ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये सध्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आमदारांचा आजचा मुक्कम येथे असणार आहे. आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गिरीश महाजन, राम कदम हे शिवसेनेच्या आमदारांच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर उभे होते.
गिरीश महाजन यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पाहताच चंद्रकांत पाटील यांना डोंगारफेम व्हायरल कॉलची आठवण करुन दिली. त्यावेळी, चंद्रकांत पाटलांसह इतरही भाजप नेत्यांना अतिशय आनंद झाला. शहाजी पाटील यांनी चक्क चंद्रकांत पाटील यांचे पाय धरले, त्यावेळी पाटील यांनीही शहाजी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
मुंबई - झाडी, डोंगारवाल्या आमदाराला पाहून चंद्रकांत पाटीलही खुश pic.twitter.com/IbFrBI7Q3w
— Lokmat (@lokmat) July 2, 2022
भाजप नेत्यांनी सर्व आमदारांचे हसत-खेळत स्वागत केले. विशेष म्हणजे 'काय झाडी, काय डोंगर काय हाटिल' या डायलॉगसाठी फेममध्ये आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांना पाहून भाजप नेते चांगलेच खुश झाल्याचं व्हिडिओत दिसून आलं. तर, शहाजी पाटील यांनीही पाया पडून आज्ञाधारकता दर्शवली.