मुंबई- अभिनेत्री श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी व सेलिब्रेटींनी मोठी गर्दी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीदेवी यांचे चाहते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येत आहेत. या सगळ्या चाहत्यांमध्ये एक असा चाहता आहे ज्याला श्रीदेवींनी मदत केली होती. श्रीदेवी यांना भेटण्यासाठी जतिन वाल्मिकी हा चाहता उत्तर प्रदेशातून आला आहे. जतिन दिव्यांग असून त्यांना डोळ्यांनी दिसत नाही. जतिन गेल्या दोन दिवसांपासून तो श्रीदेवींच्या घराबाहेर थांबला आहे. जतिन श्रीदेवींच्या सिनेमापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने जास्त प्रभावित आहे. माझा भाऊ आज फक्त श्रीदेवींमुळे जिवंत आहे, अशी भावना जतिन यांनी व्यक्त केली.
मला एका कार्यक्रमात श्रीदेवी भेटल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना माझ्या भावाच्या ब्रेन ट्यूमरबद्दल सांगितलं त्यावेळी श्रीदेवी यांनी तात्काळ माझ्या भावाच्या उपचारासाठी एक लाख रूपयांची मदत केली. तसंच हॉस्पिटलमधील बिलात एक लाख रूपयांची सूट मिळवून दिली होती. माझा भाऊ ज्या व्यक्तीमुळे जिवंत आहे, त्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी मी इथे आलो आहे, असं जतिन यांनी सांगितलं. श्रीदेवींसाठी मला काही करता येणार नाही याची कल्पना मला आहे. पण किमान त्यांच्या अंत्ययात्रेचा एक भाग होता यावं, यासाठी मी इथे आल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी ऐकून मी लगेचच मुंबईसाठी निघालो, असंही त्यांनी सांगितली.