मुंबईकडे निघालेल्या कसारा लोकलच्या चाकाला आग लागण्याचा आज प्रकार घडला आहे. यामुळे भीतीने प्रवाशांनी चालती लोकल थांबवून धुम ठोकली.
आसनगाव रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून प्रवाशांनी लागलीच रेल्वेतून उड्या टाकल्या आहेत. सकाळी ८ वाजून १८ मिनिटांची कसारा-सीएसएमटी लोकल कसाऱ्याहून मुंबईसाठी रवाना झाली होती. कसारा स्थानक ओलांडताच चाकाला आग लागून धूर येत होता. हे प्रवाशांच्या वेळीच लक्षात आले आणि लोकल थांबविण्यात आली.
आगीचं कारण काय?काही वेळाने आग विझली. चाकाला प्लॅस्टिक चिकटले असावे, यावेळी ब्रेकच्या अति घर्षणामुळे या प्लॅस्टिकने पेट घेतला असावा, असा स्थानिक कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे, असे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे शैलेश राऊत यांनी सांगितले.
घटनास्थळी रेल्वे अधिकारी - कर्मचारी दाखल झाले. काही प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या स्वरूपातील आगीवर पाणी टाकून ती विझविण्यात आली. या घटनेमुळे २० मिनिटे गाडी खोळंबळी होती असे प्रवाशांनी सांगितले.