मुंबई - भाजपाचे पू्र्वाश्रमीचे नेते व सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद आता सर्वांना परिचीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी दर्शवतच खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी काढेल, असे म्हणत राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमात नाथाभाऊंनी भाजप नेत्यांना टोला लगावला होता. मात्र, भाजपातील जुन्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे संबंध आजही मित्रत्वाचे आहेत.
एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजप पक्षासाठी काम केलं. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावे लागेल. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीटही नाकारण्यात आलं. त्यामुळे, सातत्याने पक्षातून होणारी कुचंबणा लक्षात घेऊन अखेर त्यांनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. मात्र, आजही भाजपातील बहुतांश नेत्यांसमेवत त्याचे जुने आणि घनिष्ठ संबंध कायम आहेत. नुकतेच, एका मराठी शोमध्ये, भाजप नेते किरीट सोमय्या आणि एकनाथ खडसे एकत्र आले होते.
प्रशांत दामलेंच्या 'किचन कल्लाकार' या शोमध्ये नाथाभाऊ आणि किरीट सोमय्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. या कार्यक्रमातील काही तास्कमध्ये नेतेमंडळींनी मजेशीर फटकेबाजी केली. राजकीय नेत्यांचे फोटो दाखवून त्यांबद्दल एक गाणं गाण्याचा तास्क एकनाथ खडसेंना दिला होता. त्यावेळी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो त्यांना दाखविण्यात आला. त्यावर, एकनाथ खडसेंनी हिंदी चित्रपटातील गाणं गायलं. दुश्मन ना करे दोस्त ने जो काम किया है... दुश्मन ना करे तुने एैसा काम किया है, दोस्त युही जिंदगी भर के लिए बदनाम किया है.... असे गाणे एकनाथ खडसेंनी म्हटले. यावेळी, किरीट सोमय्यांनी चुप्पी साधली, त्यांनी कुठलंही गाणं म्हटलं नाही.