सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, सोशल मीडियावरही इंदुरीकर महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले. नेटीझन्सने इंदुरीकरांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर, इंदुरीकर महाराजांनी स्वत: कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचं सांगत स्टेजवरील भेटीचं रहस्य उलगडलं.
आता, सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या एका किर्तनाची क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा इंदुरकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. इंदुरीकरांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही चांगलेच टोले लगावले आहेत. विशेष म्हणजे नेत्याच्या पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची होणारी अवस्थाच महाराजांनी आपल्या किर्तनातून सांगितली आहे.
''आता जगात दोनच माणसांवर वाईट दिवस आहेत. एक शेतकरी अन् दुसरा कार्यकर्ते. कार्यकर्त्यांवर तर लईच वाईट दिवस आहेत. त्यांना पिल्यावर चढनांपण गेलीय, टेन्शनमध्ये आहेत, कार्यकर्ते टेन्शनमध्ये. कारण, ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले विरोधीपक्षात. दीड महिना झालं पेपरात एकच चालूय. गेले गेले गेले... आले आले आले... आता ती बातमी एवढी फोचट झाली ना की, ती कुणी वाचूच शकत नाही. या आठवड्यात जाहीर प्रवेश...., लांबला....
आता जागावाटप झाला का की लगेच परत बातमी, ते स्वगृही परतले. म्हणजे कार्यकर्त्यांची अशी गंमत झाली. 40 वर्षे आपण त्यांचे भोंगे बांधले, सतरंज्या झटकल्या, बोर्ड लावले, त्यांच्यामागे बोंबलत हिंडलो अन् ते गेले दुसऱ्या पक्षात. आपण जर त्यांच्यामागं गेलो तर आपल्याला पद मिळणार... नाहीsss. बरं पहलंही नव्हतं, अन् आताही नाही.''