मुंबई : मुंबईकरांची आजची सकाळ झाली ती ढगाळ हवामान आणि पावसामुळे. याचं कारण ठरलं ते हवामानात झालेले उल्लेखनीय बदल. पश्चिमी प्रकोप, अरबी समुद्रातील आर्द्रता व वाऱ्याच्या दिशेमध्ये झालेला बदल... अशा विविध कारणांमुळे मुंबईकरांना थंडीच्या सकाळी पावसाने गाठले. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळचे साडे अकरा वाजले तरी देखील ढगाळ हवामान पाय काढण्याचे नाव घेत नव्हते; आणि अशातच मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी, मालाड, गोरेगाव, कुर्ला अशा काहीशा परिसरात किंचित का होईना पावसाच्या तुरळक सरी होऊन गेल्या.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस नोंदविण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा कमाल आणि किमान अशा तापमानात वाढ देखील नोंदविण्यात येत आहे. हे बदल होत असताना शनिवारी मुंबई सकाळ पासून ढगाळ नोंदवण्यात आली. मुंबईच्या चारी बाजूने दाटून आलेल्या ढगांनी येथे काळोख केला. जणूकाही सकाळीच संध्याकाळ झाली. सकाळी निर्माण झालेले चित्र सूर्य डोक्यावर आला तरीदेखील कायम होते. परिणामी मुंबईकर सूर्य नारायणाचे दर्शन देखील घेता आले नाही.
दरम्यान, मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात आता हवामानामध्ये बदल झाले आहेत. सर्दी आणि खोकला याचे प्रमाण वाढत असतानाच आता झालेले हवामानातील बदल धोकादायक ठरण्याची चिन्हे वर्तविण्यात आली आहेत. मुंबईसह राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, या बदलामुळे ११ जानेवारीपर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणांना अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे.
उत्तर भारतामधील पश्चिमी प्रकोप, त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्रातील आर्द्रता, उत्तर पश्चिम व मध्य भारतावर अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारे एकत्र येतील. महाराष्ट्रात ९ ते ११ जानेवारी, विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस, ९ ते १० जानेवारीदरम्यान विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग