Join us

Video : शिवसेना भवनसमोर हनुमान पठण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 4:58 PM

MNS activists detained for chanting Hanuman : सकाळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेचे सरचिटणीस आणि अन्य मनसैनिकांनी शिवाजी पार्क ठाण्याच्या अगदी खालीच असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले. 

मुंबई - शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर येथील शिवसेना भवनासमोर असलेल्या टणाटण आणि जिप्सी हॉटेलमध्ये सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हनुमान चालिसा पठण सुरू केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनीमनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार आणि पियुष सावला, लक्ष्मण पाटील, चेतना या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अजूनही हे मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात असून त्यांना सोडण्यात आलेले नाही. सकाळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेचे सरचिटणीस आणि अन्य मनसैनिकांनी शिवाजी पार्क ठाण्याच्या अगदी खालीच असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले. 

रामनवमीनिमित्त सकाळी यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते सेनाभवनसमोर रथाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर हा रथ परिसरात जिथे जिथे रामनवमीनिमित्त कार्यक्रम सुरु आहे. मात्र, पोलिसांनी मनसेच्या रथावरील भोंगेही जप्त केले आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन पोलीस ठाण्याखालील मंदिराजवळ हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोत्रचे पठण सुरू केले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, शाखा अध्यक्ष संकेत धनु, संतोष साळी ह्यांनी मनसैनिकांसमवेत हनुमान चालिसा पठाण केलं अशी माहिती मनसे कार्यकर्ते संकेत धनु यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे पोलीसही खाली उतरले आणि मंदिराजवळील मनसे कार्यकर्त्यांना विचारणा करू लागले. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही. जोपर्यंत आमच्या सहकाऱ्यांना सोडले जात नाही, तोपर्यंत आमचं हनुमान चालिसा पठण सुरूच राहील असा इशाराही मनसेने दिला आहे. त्यांनतर पोलीस उपयुक्त प्रणय अशोक यांनी हनुमान चालीसा मनसे कार्यकर्त्यांना थांबवण्यास सांगून ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून देण्याबाबत ग्वाही दिली. आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई कशासाठी केली ते माहीत नाही. त्यांना पोलीस ठाण्यात का आणलं हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं नाही. पण आज रामनवमी आहे. त्यामुळे हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोताचे पठण करतो आहे. देवाची भक्ती करतोय. हा निषेध नाही. आम्ही आमच्या देवाची भक्ती करतोय. कुणाला निषेध वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही, अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

 

टॅग्स :मनसेसंदीप देशपांडेपोलिसराम नवमी