Join us

Video: राज ठाकरेंनी 'तिला' विचारलं, कशासाठी भेटायचं होतं?...त्यानंतर त्या चिमुकलीनं काय केलं बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 1:41 PM

सोमवारी ही चिमुकली तिच्या आई-वडिलांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज या निवासस्थानी पोहचली.

मुंबई -  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रियता लाभलेला नेता म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे पाहिलं जातं. राज ठाकरे यांच्या मनसेचा राज्यात एकमेव आमदार निवडून आला आहे. मनसे पक्षाची राजकीय स्थिती बिकट असली तर राज ठाकरेंची अफाट लोकप्रियता आजही कायम आहे. 

अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण राज ठाकरेंचे चाहते आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेण्याची, त्यांना भेटण्याची इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याला असते. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान चिमुकली तिच्या वडिलांना राज ठाकरेंना भेटायचं आहे असं म्हणत असते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या चिमुकलीला भेटण्याचं आमंत्रण दिलं. 

सोमवारी ही चिमुकली तिच्या आई-वडिलांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज या निवासस्थानी पोहचली. राज ठाकरे यांनी आपुलकीने या चिमुकली जवळ घेत मला का भेटायचं होतं? असा प्रश्न विचारला. त्यावेळी छोट्या चिमुरडीने राज ठाकरे यांच्या जवळ जात मायेने त्यांच्या गालावर पप्पी दिली. राज ठाकरेंनी वडिलधाऱ्याप्रमाणे या चिमुकलीच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले. तसेच एका पिशवीत गोड खाऊ दिला. राज ठाकरे आणि चिमुकलीच्या भेटीमुळे सगळ्यांना सुखद धक्का मिळाला. 

पाहा व्हिडीओ - 

रुद्राणी असं या ३ वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. मनसे कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांची ही कन्या आहे. माझी मुलगी राज ठाकरेंची मोठी चाहती आहे. राज ठाकरेंचे भाषण सुरु झाल्यानंतर ती टीव्हीसमोर बसते. मी पक्षाच्या सभेला निघालो तर माझ्यामागे येण्याचा हट्ट धरते. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तिची भेट राज ठाकरेंसोबत झाली. ही भेट अविस्मरणीय असून हे सुवर्णक्षण दिल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, शब्द अपुरे पडतील इतकी सुंदर भेट झाली असं प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे