मुंबई - कोरोनामुळे यंदाही दहीहंडी उत्सवावर सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे, राज्यभरात दहीहंडीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे दिसलाच नाही, कोरोनाच्या सावटात दहीहंडी फुटलीच नाही. मात्र, मुंबईत मसनेनं कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा केला. भाजपा तसेच मनसेची काही गोविंदा पथके सज्ज झाली होती. विशेष म्हणजे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही मुंबईती मातोश्री बंगल्यासमोर मनसैनिकांनी दहीहंडी फोडली.
मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनत ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला. ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. त्यानंतर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या समोरच मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. मनसेच्या कार्यकर्त्याने अखिल चित्रे यांना खांद्यावर बसवलं आणि हंडी फोडली. त्यानंतर घोषणाबाजी करून कार्यकर्ते निघून गेले.
मुंबईत 4 ठिकाणी गुन्हे दाखल
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असून कोरोना निर्बंधांमुळे सार्वजनिक उत्सवांना राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र, कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा आणि मनसेची काही गोविंदा पथके सज्ज झाली. त्यामुळे पोलिसांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर मुंबईत चार ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. कस्तुरबा मार्ग, घाटकोपर, वरळी, काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.