Join us

Video: अजानवेळी मशिदीसमोरील घरात हनुमान चालीसा वाजवली; मुंबई पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 10:20 AM

मुंबईतील कुरार व्हिलेज इथं मशिदीसमोर राहत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याने अजानवेळी घरातच हनुमान चालीसा लावली

मुंबई – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवावेत यासाठी मनसेनं आंदोलन सुरू केले आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अनेक ठिकाणी मशिदीसमोर हनुमान चालीसा कार्यकर्त्यांकडून लावली जात आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. खबरदारी म्हणून शहरातील मनसेच्या १५ हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली. काहींना ताब्यात घेतले. मात्र हे आंदोलन एक दिवसांचे नसून सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

मुंबईतील कुरार व्हिलेज इथं मशिदीसमोर राहत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याने अजानवेळी घरातच हनुमान चालीसा लावली. मनसे कार्यकर्ते संतोष हे कुरार येथे मशिदीजवळ राहतात. राज ठाकरेंच्या आदेशानुसार संतोष यांनी भोंग्यावर अजान सुरू झाली असताना लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली. मात्र त्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले. या प्रकाराचा विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे, केतन नाईक यांनी निषेध केला.

विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे म्हणाले की, सकाळीच सांगितलं होतं. सरळ सोप्या भाषेत कळत नसेल तर आम्हाला हे करावंच लागेल. सरकार आम्हाला देवळांवर भोंगे लावू देणार नाही,मशिदींसमोर विरोध प्रदर्शन करू देणार नाही तर आम्ही आमच्या घरातच हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच. कुरार गाव येथील मशिदीजवळील राहत असलेल्या महाराष्ट्र सैनिक संतोष यांनी अजान सुरु असताना आपल्या घरातच लाऊडस्पिकर वर हनुमान चाळीसा वाजवून राज साहेबांच्या आदेशाच पालन केलं. सकाळीच मनसे उपविभाग अध्यक्ष केतन नाईक यांनी परिसरातील हिंदू नागरिकांना राज साहेबांचं पत्रक वाचून दाखवत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध एकजूट होण्यासाठी आवाहन देखील केलं होतं असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले राज ठाकरे?

हा विषय केवळ मशिदींसाठीचाच नाही तर, मंदिरांवरील भोंगेही खाली आले पाहिजे. ज्या-ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होईल, ते-ते बंद झाले पाहीजे. विश्वास नांगरे पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले, की एवढे अर्ज आले होते. एवढ्यांना परवानगी दिली. पण, महाराष्ट्रातील बहुतांश मशिदी या अनधिकृत आहेत. म्हणजेच त्यावरील भोंगेही अनधिकृतच, मग त्यावर भोंगे लावण्यासाठी सरकार अधिकृत परवानगी कसे देऊ शकते. हे समजण्या पलिकडे आहे. अशी परवानगी कशी दिली जाऊ शकते, एवढेच नाही, तर आम्हाला देताना तुम्ही एक दिवसाची, दहा दिवसांची परवानगी देणार. मग त्यांना वर्षाची परवानगी कशी दिली जाते? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

टॅग्स :मनसेराज ठाकरे