मुंबई - राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विधिमंडळ परिसरात नेतेमंडळींची रेलचेल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरग्रस्त भाग, मणीपूर प्रकरण, महिला सुरक्षा यांसह विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांसह अनेक मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे विधिमंडळाचं काम सुरू आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत पावसाळी अधिवेशनामुळे संसदेतही वातावरण तापलंय. मात्र, आज अचानक विधिमंडळ परिरात मोदी आले... मोदी आले... अशी कुजबूज सुरू झाली आणि सर्वांना गराडाच घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीत आहेत. विरोधकांनी मोदी सरकारला मणीपूरच्या मुद्द्यावरुन चांगलंच घेरलं आहे. त्यामुळे, विरोधकांच्या प्रश्नांना मोदी सरकारच्यावतीने अनेकजण सभागृहात बोलताना पाहायला मिळत आहे. तर, मोदी हेही तिथेच आहेत. मात्र, विधिमंडळ परिसरात आज अचानक मोदी आले... अशी कुजबूज सुरू झाली. विशेष म्हणजे ते आल्यानंतर त्याच्यापाठीमागे काही कार्यकर्तेही दिसत आहेत. तर, मीडियाच्या कॅमेऱ्यानेही त्यांना घेरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे सभागृह परिसरातच त्यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी भेट झाली. त्यावेळी, दोघांनी हस्तांदोलनही केले. तसेच, माध्यमांना पोज देत फोटोही काढले. दरम्यान, यावेळी, आमदार प्रताप सरनाईक हेही सोबत होते.
विधिमंडळ परिसरात मोदींची चर्चा झाली, पण हे मोदींचे डुप्लीकेट विकास महांते आहेत. सेम टू सेम मोदींप्रमाणे दिसणारे विकास महांते आज सभागृह परिसरात आले होते. आमदार प्रताप सरनाईक हेही त्यांच्यासमवेत होते. मोदी जॅकेट, पांढरी दाढी, चालण्याची स्टाईल आणि देहबोलीही तशीच असल्याने अनेकांचा गैरसमज झाला की, खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदीच विधिमंडळात आले की काय?. मात्र, सरतेशेवटी हे मोदींचे डुप्लीकेट विकास महांते असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासमवेत फोटो काढले, सेल्फी घेतले आणि संवादही साधला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत चर्चा करताना ते दिसून येतात.