Join us

VIDEO- भर पावसात अडीच तास उभं राहून पोलीस हवालदाराने ट्रॅफिक केलं मॅनेज, कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 9:30 AM

माझ्याकडे रेनकोट घालायला वेळ नव्हता.

मुंबई- मुंबई शहरातील काही भागात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवून दिली.  मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच ट्रॅफिक पाहायला मिळाली. या पहिल्या पावसात रस्त्यावर ट्रॅफिक मॅनेज करतानाचा एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस भर पावसात तब्बल अडीच तास उभं राहून ट्रॅफिक मॅनेज करताना पाहायला मिळतं आहे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट करून शेअर केला आहे. 

नंदकुमार इंगळे (वय 47) असं या ट्रॅफिक पोलिसाचं नाव असून कांदिवली पूर्व येथील आकुर्ली भागात ते ड्युटीवर होते. अचानक मुसळधार पाऊस व जोराचा वारा वाहू लागल्याने अर्थातच ट्रॅफिक झालं होतं. वाऱ्याचा वेग इतका होता की स्कायवॉक खाली असलेले बॅरिगेट्स पुढे ढकलले गेले होते. या परिस्थितीमध्ये नंदकुमार इंगळे इतक्या पावसात ट्रॅफिक वर नियंत्रण मिळविण्याचा व प्रवाशांना रस्ता दाखविण्याचं काम करत होते. 

'माझ्याकडे रेनकोट घालायला वेळ नव्हता. मी माझं पाकीट व मोबाइल वॉर्डनला दिला व त्याला कव्हर करण्यास सांगितलं. आकुर्ली रोडवर त्यावेळी खूप गाड्या होत्या. त्यामुळे जर मी तिथून कुठे गेलो असतो तर गोंधळ झाला असता', असं इंगळे यांनी सांगितलं.सोमवारच्या घटनेनंतर मंगळवारी इंगळे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं त्यांना समजलं. इंगळे स्वतः सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसल्याने त्यांना आधी काही समजलं नाही. पण नंतर व्हिडीओवरून सोशल मीडियावर लोक आपलं कौतुक करत असल्याचं त्यांना समजलं. 

टॅग्स :मुंबईपाऊसवाहतूक पोलीसवाहतूक कोंडी