Video: नवनीत राणांनी वाटल्या खराब साड्या; लोकांचा संताप, काँग्रेसनेही विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:54 PM2024-03-27T19:54:00+5:302024-03-27T20:16:42+5:30
खासदार नवनीत राणा गाठीभेटीसाठी गावदौरा करत असताना स्थानिकांनी त्यांना घेरलं होतं.
मुंबई - निवडणूक आली की आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघात चांगलेच सक्रीय होत असतात. लोकांमध्ये जाऊन, लोकांच्या समस्या जाणून घेऊन, लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका अधिकपणे या काळात पाहायला मिळते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मतदारसंघातील नागरिकांसोबत सुसंवाद वाढवला असून गाठीभेटी व दौरे सुरू केले आहेत. गेल्या दिवाळीच्या सणाला खासदार राणा यांनी मतदारसंघात शिधा वाटप केले होते. तर, आता रंगपंचमीच्या सणानिमत्ताने साड्यावाटप केले आहे. मात्र, राणा यांनी वाटलेल्या साड्या खराब आणि हलक्या असल्याची ओरड आदिवासी महिलांना केली आहे.
खासदार नवनीत राणा गाठीभेटीसाठी गावदौरा करत असताना स्थानिकांनी त्यांना घेरलं होतं. त्यावेळी, तुम्ही दिलेल्या साड्या अतिशय खराब असून न दिलेल्या बऱ्या, असे म्हणत संताप व्यक्त केला. त्यावेळी, कंपनीवाल्यांनी तशा साड्या पाठवल्या आहेत, २-३ गावातच अशा साड्या आल्या आहेत. पुढच्यावेळेस चांगल्या घेऊ, असे नवनीत राणा म्हणताना दिसून येतात. तर, पुढच्यावेळेस नको आत्ताच साड्या बदलून द्या, असेही स्थानिक म्हणताना व्हिडिओत ऐकायला मिळत आहे. नवनीत राणांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, खासदार राणांवर टीकाही केली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत जाब विचारला आहे. तसेच, मोदींनी या साड्या दिल्या असतील तर, या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
''खासदार नवनीत राणा यांच्या मतदार संघात २ लाख साड्या वाटण्यात आल्या आहेत. या साड्या पंतप्रधान मोदींनी वाटल्याचं राणा व्हिडीओत सांगत आहेत. जर २०० रुपयांप्रमाणे २ लाख साड्या वाटल्या असतील तर याची किमंत होते ‘४ कोटी रुपये’. मग जर ४ कोटी प्रमाणे प्रत्येक मतदार संघात वाटल्या असतील तर हा आकडा विचार करण्यासारखा आहे. अर्थात हा पैसा पंतप्रधान मोदी किंवा भाजपचा असेल. मग आता या पैशाचा हिशोब तर भाजपला आणि मोदींना द्यावाच लागेल ना?,'' असे काँग्रेसने म्हटले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या मतदार संघात 2 लाख साड्या वाटण्यात आल्या आहेत. या साड्या पंतप्रधान मोदींनी वाटल्याचं राणा व्हिडीओत सांगत आहेत. जर 200 रुपयांप्रमाणे 2 लाख साड्या वाटल्या असतील तर याची किमंत होते ‘4 कोटी रुपये’. मग जर 4 कोटी प्रमाणे प्रत्येक मतदार संघात वाटल्या असतील तर हा… pic.twitter.com/RUYyz34cZg
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 27, 2024
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी गत लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी, महाआघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृतपणे पाठिंबा दर्शवला होता. मात्र, आता नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट जाहीर केलं आहे. पण, अमरावतीमधील स्थानिक भाजपा नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे, अमरावतीमधील लोकसभा मतदारसंघात भाजपा कशारितीने सामोरे जाईल हे पाहावे लागेल.