मुंबई/सोलापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर प्रहार करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली. सोलापूरात एसटी कामगारांच्या सुरू असेलल्या संपाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, राज्य सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस हा बेभरवशाचा पक्ष असल्याचं पाटील यांनी म्हटलं. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतंय. आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. सांगलीत बीजेपीसोबत सलगी करण्याच्या राष्ट्रवादीच्या डावाला भाजप फसणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी हा बेभरवशाचा पक्ष असल्याचे पाटील यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात”., असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली आहे.