Join us

राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:16 PM

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना आणि बारामतील भाषणावेळीही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज गुरुवारी निर्णय होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचे वाचन करतील. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दीक वार सुरू झाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवारअजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसून येतात. अजित पवारही नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य करत आहेत. त्यावरुनच, रोहित पवारांनी अजित पवारांना जुन्या भाषणाची आठवण करुन दिली. 

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना आणि बारामतील भाषणावेळीही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार त्यांना प्रत्युत्तर देताना दिसून येतात. आता, आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य करताना अजित पवारांनी होय, मला माझ्या काकामुळेच किंमत आहे, असे म्हटले आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवारांनी, मला माझ्या काकामुळे आणि तुला तुझ्या काकामुळेच किंमत असल्याचं म्हटलं होतं. रोहित पवारांनी अजित पवारांना त्यांच्या याच विधानाची आठवण करुन देत निशाणा साधला. तसेच, भाजपलाही लक्ष्य केलं. 

मा. अजित #काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलिकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैव, असे ट्विट रोहित पवार यांनी केले. तसेच, जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर #का अन्याय केला जातो? या #का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल!, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले होते अजित पवार?

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे अजित पवार हे शरद पवार गटाविरोधात आणखी आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजितदादांनी शरद पवार यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यांनी म्हटले होते की, सका पाटलांचा प्रचार करताना जॉर्ज फर्नांडिस 'पापापा' असं लिहून प्रचार करत होते. म्हणजेच 'पाटलाला पाडलं पाहिजे'. आता 'काका का' असे लिहून प्रचार केला पाहिजे, अशी भाषा वापरत अजितदादांनी शरद पवारांना थेट आव्हान दिले होते.

प्रफुल्ल पटेलांवर धूर्त म्हणत टीका

''लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सहकाऱ्यांची ‘राजकीय उपयुक्तता’ संपणार असल्याने भाजपा नव्या सहकाऱ्यांना अलगद बाजूला फेकेल हा अंदाज कदाचित ‘निवडणूक आयोगाद्वारा नियुक्त’ झालेल्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांना आला नसला तरी प्रफुल पटेल यांनी ही बाब अत्यंत अचूकपणे हेरलीय. यातूनच भविष्यातला संभाव्य धोका टाळत त्यांनी आपली राज्यसभेची टर्म धूर्तपणे अजून दोन वर्षांनी वाढवून घेतलेली दिसतेय,'' असे रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा धूर्त असा उल्लेख करत अजित पवारांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीबद्दल रोहित पवार यांनी त्याचं अभिनंदनही केले, व भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, रोहित पवार यांना अजित पवार गटानेही प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आपली पात्रता आहे का?, असा टोला लगावला. 

टॅग्स :रोहित पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराज ठाकरे