Kurla Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांकडूनच प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. मात्र या सभेआधी झालेल्या एका अश्लील नृत्यामुळे मंगेश कुडाळकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित केल्याचे म्हटलं आहे.
कुर्ल्याचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मंगेश कुडाळकर यांच्या सभेची सुरुवात अश्लील डान्सने करण्यात आल्याने विरोधकांनी शिंदे गटाला धारेवर धरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाची ही पहिलीच जाहीर प्रचार सभा होती.अश्लील डान्सचा व्हिडिओ ठाकरे गटाने सोशल मीडियावर शेअर करत टीका केली आहे. शिंदे गटाच्या कुर्ला विधानसभा उमेदवारचा तथाकथित जनहित प्रचार! महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे!!! असे म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
व्हिडीओमध्ये एक तरुणी अश्लील हावभाव करत ‘कमरिया’ भोजपूरी नाचताना दिसते आहे. सभेच्या स्टेजवरच हा सगळा प्रकार सुरु होता. त्यावेळी तिथे समोर महिला, मुलीही बसल्या होत्या. हा व्हिडीओ पोस्ट करत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत टीका केली आहे.
दरम्यान, या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश कुडाळकर हे शंभर टक्के निवडून येतील असा दावा केला आहे. तसेच येत्या २३ नोव्हेंबरला अॅटम बॉम्ब फुटणार, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. "ही मुंबईतील पहिली प्रचारसभा आहे. त्याचा मान आपल्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झाले आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे. बाकी लोकांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.