Join us

VIDEO : आमचा पगार जिल्हा बँकेतून नको, संतप्त शिक्षकांची मागणी

By admin | Published: June 22, 2017 2:00 PM

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - मुंबईतील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई ...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुंबईतील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा निर्णय ३ जून २०१७ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. या निर्णयाला शिक्षक भारतीने तीव्र आक्षेप घेऊन आंदोलनचा पवित्रा घेतला आहे. मुंबई बँक नको, राष्ट्रीयकृत बँक हवी. या मागणीसाठी शिक्षक भारतीतर्फे मुंबईभर शिक्षक, शिक्षकेतरांच्या सह्यांची मोहीम राबवली जात आहे.
 
त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जवळपास १५ हजार शिक्षक, शिक्षकेतरांनी स्वाक्षरी करुन आपला निषेध नोंदवला आहे. या सर्व सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन राष्ट्रीयकृत बँकेतूनच पगार सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली आहे. 
(राष्ट्रीयीकृत बँकेतूनच पगार द्या!)
 
शिक्षकांच्या निदर्शनाची मालिका
मुंबईव्यापी आंदोलनाची सुरवात  गुरुवारपासून  (२२ जून) झाली असून संतप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी चेंबूरच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयावर निदर्शनं केली. शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार सुरक्षित राहण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेची गरज असताना. बुडणाऱ्या मुंबई बँकेकडे पगार खाती सोपवण्याचे प्रयोजन काय? असा सवाल शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी केला आहे. 
 
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मतदार संघात निदर्शने 
परळच्या कामगार मैदानात दक्षिण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निदर्शने मंगळवार(२७ जून) होणार आहेत तर शनिवार (१ जुलै ) शिक्षणमंत्री तावडे यांच्या बोरीवली विधानसभा मतदार संघात शिक्षक भारती आंदोलन करणार आहे. नवीन शासन आल्यापासून शिक्षण आणि शिक्षक विरोधी धोरणांचा भडिमार होत आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अनुदानित शाळा बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे.  २८ ऑगस्ट २०१५ चा काळा शासन निर्णय, रात्रशाळा बंद करण्याचे धोरण, कला-क्रीडा शिक्षकांवरील अन्याय, अतिरिक्त शिक्षक, अल्पसंख्यांक संस्थांच्या कारभारातील हस्तक्षेप आणि हजारो रिक्त जागा या आणि अशा अनेक निर्णयांच्या विरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. 
 
वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार गेली सहा वर्षे युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत नीट व सुरळीतपणे १ तारखेला पगार होत आहे. राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पगार होत असल्याने शिक्षक, शिक्षकेतरांना भारतभर बँकींग व एटीएमची सुविधा उपलब्ध होत आहे. या बँकेबाबत कोणतीही तक्रार नाही, असे असतानाही अचानक बँक बदलल्याने शिक्षक, शिक्षकेतरांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यभर जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत. नागपूर, बुलडाणा, बीड आणि नाशिक या बँकांमधील ठेवी व कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही मिळालेले नाहीत. नुकतेच नाशिक जिल्हा बँकेतील पगार व ठेवी अडचणीत आल्याने जिल्हा बँकेतून होणारे पगार इतर बँकेकडे देण्यात आले आहेत. मुंबई बँकेचा कारभार व संचालक मंडळ यांची चौकशी सुरु असून मीडियामध्ये याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशा बुडणाऱ्या जिल्हा बँकेत शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार करण्याचा निर्णय गंभीर आहे. गुरुवार दि. २२ जून दुपारी १ वाजता शिक्षण निरीक्षक कार्यालय, चेंबूर येथे निदर्शने केली , अशी माहिती उत्तर विभागाचे अध्यक्ष मच्छिंद्र खरात यांनी दिली. 
https://www.dailymotion.com/video/x84563q