मुंबई : खासगी कंपनीच्या महिला शौचालयात आॅफिस बॉय मोबाइलद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार चर्नी रोड परिसरात उघडकीस आला आहे. एका महिला कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. तिने याबाबत पोलिसांत धाव घेतली. विकृत आॅफिस बॉय अरविंद विठ्ठल अहिरे (३२) याला डी. बी. मार्ग पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.अहिरे चेंबूर परिसरात राहतो. २४ वर्षीय महिला कर्मचारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेली. त्याच दरम्यान तिचे छताकडे लक्ष गेले, तेव्हा मोबाइलचा काही भाग दिसून आला. तिने त्वरित तो मोबाइल काढला. त्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचे दिसून आल्याने तिला धक्काच बसला.त्यामध्ये तिच्यासह अन्य सहकारी महिलांचेही व्हिडीओ रेकॉर्डिंग होते. तिने याबाबत तत्काळ वरिष्ठांना कळविले. तपासणीत तो मोबाइल आॅफिस बॉयचा असल्याचे उघड झाल्याने त्याने पळ काढला. तरुणीने थेट डी.बी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अरविंद अहिरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. तो केव्हापासून अशा प्रकारे व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचा? त्याने हे व्हिडीओ कुठे अपलोड केले आहेत का? याबाबत डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी दिली.
महिलांच्या शौचालयात व्हिडीओ रेकॉर्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 5:24 AM