Video : बीडीडी चाळीतील रहिवाशांत नाराजी, ऐन पावसाळ्यात घरं केली रिकामी
By पूनम अपराज | Published: June 24, 2022 08:57 PM2022-06-24T20:57:00+5:302022-06-24T21:46:57+5:30
BDD Chawl Redevelopement : इतका वेळ दिला, थोडा आणखी वेळ द्यावा अशी व्यथा लोकमतकडे मांडली आहे. ऐन पावसाळ्यात घरं खाली करू नये अशी या रहिवाशांची मागणी आहे.
मुंबई : बीडीडी चाळी दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याने त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार वरळी, ना. म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासास (BDD Chawl Redevelopment) सुरुवात झाली आहे. म्हाडाचे (Mhada) मुंबई मंडळ या चाळींचा पुनर्विकास करीत आहे. मात्र, डिलाईल रोड येथे वसलेल्या बीडीडी चाळीतील काही रहिवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास पूर्ण बिल्डिंग २७ जूनला रिकामी करून देण्याचं आश्वासन बिल्डिंगच्या रहिवाशांनी दिलेलं आहे. मात्र, ही आमची नाराजी असून पोलिसांच्या (Police) भीतीपोटी आम्ही भर पावसाळ्यात घरं खाली करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नसून आम्ही हा आनंदाने घेतलेला निर्णय नाही अशी व्यथा डिलाईल रोड येथील बीडीडी चाळीतील रहिवाशी वैशाली मोहिते यांनी लोकमतशी बोलताना मांडत आहेत.
डिलाईल रोड येथे एकूण 32 बीडीडी चाळी आहेत. त्यापैकी 1 हॉस्पिटल आणि 2 पोलिस कर्मचारी यांची इमारत आहे. बीडीडी चाळ क्रमांक 11 पूर्णपणे खाली करून ती पाडण्यात आली आहे. तसेच बीडीडी क्रमांक. 3,4,5,6 आणि 12, 30 काही रहिवाशी म्हाडाने दिलेल्या ट्रान्सीट कॅम्पमध्ये स्थलांतरित झाले आहे. मात्र, काही रहिवाशी नाराजीपोटी आणि काही त्यांना भेडसावणाऱ्या गोंधळामुळे मूळ जागा सोडण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. बीडीडी चाळीत आमच्या ४ पिढ्या राहत असून गेले वर्षानुवर्षे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमच्या घराचं भाडं आम्ही भरतोय. तरी देखील बीडीडी चाळीतील पुनर्विकास प्रकल्प आणल्यानंतर २०१६ साली काही रहिवाशांचे बायोमेट्रिक करण्यात आलं. ते कशासाठी आमच्या सर्व घरांबाबत कागदपत्रे आणि आवश्यक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध आहे. त्यानंतर या बायोमेट्रिक पद्धतीला विरोध केल्यानंतर ती पद्धत बंद करण्यात आली अशी माहिती बीडीडी चाळीतील रहिवाशी वैभव मोहिते यांनी दिली. तसेच पुढे ते म्हणाले, आम्हाला रितसर अग्रीमेंट न देता, आमच्या कुटुंबियांवर घरं खाली करण्यास पोलीस बळाचा दुरूपयोग केला जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही, तर ज्या काही अग्रीमेंटच्या नमुन्यात त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करावी अशी किरकोळ मागणी आमची आहे.
पोलिसांच्या भीतीपोटी आम्ही घरं खाली करायचं आश्वासन दिलं, बीडीडी चाळीतील रहिवाशांची व्यथा @Awhadspeaks@MumbaiPolicepic.twitter.com/jp0o1TmUpU
— Lokmat (@lokmat) June 24, 2022
आम्ही मानसिक तणावाखाली घरं खाली करून देत आहोत. आमच्या घरी आजारी, वयोवृद्ध माणसं आहेत. आज घरं खाली करतील, उद्या करतील अशी टांगती तलवार डोक्यावर आहे. म्हणून आम्ही घरं खाली करून देण्याचं आश्वासन देत आहोत. तसेच म्हाडाने आम्हाला रितसर अग्रीमेंट दिले तर आम्ही आभारी असल्याचे देखील वैशाली मोहिते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच बीडीडी चाळीतील रहिवाशी अनिता पालांडे यांनी आता हे पावसाचे दिवस असून घराला टाळे असून देखील पोलीस बळाचा वापर करून टाळं फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो तरी देखील ते आम्हाला वरिष्ठांचे आदेश असल्याचं सांगतात. २ वर्ष कोविडमध्ये शाळा बंद होत्या, आता कुठे शाळा सुरळीत सुरु झाल्या आहेत. इतका वेळ दिला, थोडा आणखी वेळ द्यावा अशी व्यथा लोकमतकडे मांडली आहे. ऐन पावसाळ्यात घरं खाली करू नये अशी या रहिवाशांची मागणी आहे.