मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांनी पार्थचे कान टोचल्यानंतर आता रोहित पवार यांनी पार्थ विषयावर स्पष्टच आपलं मत मांडलं आहे.
'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे, आदित्य तटकरे, धनंजय मुंडे शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी काल (13 ऑगस्ट) सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली. मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचं कळतं. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतला आहे.
दुसरीकडे पार्थचे चुलत भाऊ आणि आमदार रोहित पवार यांनी पार्थ विषयावर आपलं मत माडलं आहे. पार्थ हा कौटुंबिक विषय आहे, असे रोहित यांनी म्हटलं. ''सुशांतसिंह राजपूत केससंदर्भात पवारसाहेबांनी स्टेटमेंट दिलंय. त्यामुळे, जेव्हा पक्षाचे अध्यक्ष स्टेटमेंट देतात, तेव्हा आम्ही काय वेगळं बोलणार'' असं म्हणत शरद पवार यांचं मत हेच पक्षासाठी अंतिम असल्याचं रोहित यांनी सांगितलं. तसेच, पार्थ पवार यांच्याबद्दल बोलतानाही रोहित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ''तो कुटुंबाचा विषय आहे, साहेबांनी ते वक्तव्य केलंय. माझं असं म्हणणं आहे, कौटुंबिक विषयावर बोलण्यापेक्षा, मी अगोदरपासूनच म्हणत होतो की, यामध्ये कुठंतरी राजकारण येतंय, आता कुठ स्पष्ट झाल्याचं दिसतंय, असे रोहित पवार यांनी म्हटले. यावेळी, बिहार विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या मोठ्या नेत्याकडे जबाबदारी देण्यात आल्याचा उल्लेखही रोहित यांनी केला.
दरम्यान, अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. अजित पवार अथवा पार्थ पवार हे दोघेही नाराज नाहीत. यामुळे ते नाराज आहेत, असे मानण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ पवार कुठलाही निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."
अजित पवारांचे मौन कायम-
सिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.
पार्थच्या नव्या ट्विटची चर्चा-
पार्थने सकाळीच एक ट्विट करून, कोरोनाच्या लढ्यात आपण सगळे कष्ट करत आहोत, यातून चांगलेच काहीतरी निघेल. महाराष्ट्राचे हे स्पिरीट आहे. आपण हार मानत नाही अशा आशयाचे ट्विट केले. सोबत त्याने गणरायाची मूर्तीही जोडली होती. मात्र, त्या ट्विटमधील आपण हार मानत नाही या वाक्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.