Join us

मंत्री बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडिओ, वेशांतर करुन केलं होतं स्टींग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 3:36 PM

बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला.

ठळक मुद्देजवळपास 27 मिनिटांच्या या व्हिडिओत बच्चू कडू यांनी विविध ठिकाणी खरेदीसाठी आणि सरकारी योजनांसाठी भटकंती केल्याचं दिसून येत आहे. 

अमरावती/मुंबई - आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी चक्क वेशांतर करुन अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. त्यामुळे, त्यांची ही वेगळी स्टाईल चर्चेचा आणि टीकेचाही विषय बनली होती. यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रयत्न केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. आता, या घटनेचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 

बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबह उडाली होती. 

यासंदर्भात बोलताना कडू यांनी यापुढेही बच्चू कडून शेतकरी किंवा मजूर बनून येऊ शकतो, असे म्हटले आहे. आता, या घटनेचा व्हिडिओ कडू यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुनही शेअर केला आहे. स्टींग ऑपरेशन केल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. जवळपास 27 मिनिटांच्या या व्हिडिओत बच्चू कडू यांनी विविध ठिकाणी खरेदीसाठी आणि सरकारी योजनांसाठी भटकंती केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मंत्रीपद घेतलं म्हणजे बटन दाबल्यासारखं सर्वकाही व्यवस्थित होतं, असं नाही. आंदोलन हे तुमच्या मागणीला जिवंतपणा आणण्याचं काम असतं, मी वेशांतर करुन गेलो. काही प्रश्न हे बैठका घेऊन मिटत नाहीत. प्रशासनावर अंकुश ठेवायचा असेल, सर्वसामान्य माणसांसाठी प्रशासन लोकाभिमूख करायचं असेल तर हा अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आज बच्चू कडू युसूफ खान म्हणून आला, उद्या एखादा शेतकरी, मजूर बनूनही येऊ शकतो, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच, प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

बँकेत कर्ज तर रेशन दुकानात धान्य मागितलं

पातूर येथील एका बँकेत जाऊन त्यांनी कर्जासाठी अर्ज केला. कर्ज मंजुर करण्यासाठी   पैसेही देऊ केले. परंतु व्यवस्थापकाने रितसर पद्धतीनेच अर्ज केल्यानंतर कर्ज मंजुर होईल असे सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी दिल्या व धान्याची मागणी केली. परंतु, ऑनलाइन वितरण व्यवस्था असल्याने कोणालाही धान्य देता येणार नसल्याचे त्यांना दुकानदारांनी सांगितले.  एका दुकानात प्रतिबंधित गुटख्याची मागणी केली असता दुकानदाराने त्यांना दिला. त्यावेळी कडू यांनी पोलिसांना बोलावून गुटख्याचा साठा जप्त करून दिला व स्वत:समक्ष गुन्हा दाखल करून घेतला.

टॅग्स :बच्चू कडूशेतकरीनगर पालिका