विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी सकाळपासूनच उत्साह दाखवायला सुरुवात केली आहे. अहमदाबादच्या मैदानावर चाहत्यांसह दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. काहीही करुन भारताने आजचा सामना जिंकलाच पाहिजे, अशी भूमिका भारतीय चाहत्यांची आहे. तर, पाकिस्तानी चाहतेही त्यांच्या संघासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा क्रिकेट संघ अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे करण्यात आलेल्या स्वागतावरुन शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.
अहमदाबादमध्ये पाकिस्तानच्या संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या स्वागताचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले. त्यावरुन, बीसीसीआयला ट्रोलही करण्यात आलं. भारतीय क्रिकेट चाहत्यांशिवाय अनेक नेत्यांनीही सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. आता, शिवसेनेनं भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होत असतानाच ट्विट करुन आपला रोष व्यक्त केला आहे. तसेच, बीसीसीआय आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
दु:ख एवढ्याच गोष्टीचं वाटतं की, यांच्या मनात जवानांच्या बलिदानाचं दु:ख असत नाही. निवडणुकांवेळी देशभक्ती आणि युद्धाच्या चर्चेतून वातावरण गरम करणारे पाकिस्तानसमोर रेड कॉर्पेट अंथरण्यात लाज बाळगत नाहीत, अशा शब्दात शिवसेनेनं बीसीसीआय आणि भाजपावर सडकून टीका केलीय.
मुलींचा डान्स अन् पुष्पवृष्टी
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला. त्यावेळी, त्यांच्या स्वागतासाठी मुलींचा डान्सही होता. याशिवाय खेळाडूंवर पुष्पवृष्टीही केली गेली. पाकिस्तानी खेळाडूंच्या या स्वागतावर भारतीय पाठिराख्यांनी सडकून टीका केली. काही युजर्सनी भारतीय लष्कराचे फोटो शेअर करत जवानांचे बलिदान विसरले का असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, शिवसेनेनंही तोच मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. पाकिस्तानी खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी तरुणी गुजराती वेशभुषेत आल्या होत्या. ढोलवादनही केले गेले. सोशल मीडियावर या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी पाकिस्तानचा संघ भारतात येताच पाहुणचाराने भारवल्याचे व्हिडीओ समोर आले होते.