मुंबई - राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. २ लाख कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प स्थगित केले. रेल्वे, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, समृद्धी महामार्ग, अनेक रस्ते प्रकल्प सर्वांना स्थगिती दिली का? कंत्राटदारांना सिग्नल द्यायचा आहे का? येऊन भेटावे असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला.
तसेच हे प्रकल्प रखडले तर प्रकल्पांची किंमत वाढणार आहे. त्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. भाजपा त्याचा निषेध करते अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली.
किरीट सोमय्या आणि शिवसेनेमधील वाद खूप जुने आहेत. मातोश्रीसह उद्धव ठाकरे, राहुल शेवाळेंवर सोमय्या यांनी अनेकदा आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांकडून मातोश्रीला टक्केवारी दिली जाते असा थेट आरोप सोमय्या यांनी यापूर्वीही लावले आहेत. याबाबत युती झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढविली. यावेळी किरीट सोमय्या यांना तिकीट देऊ नका असा दबाव भाजपा नेत्यांवर शिवसेनेकडून टाकण्यात आला होता. तसेच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारुन मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली.
राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती तुटून शिवसेनेने महाविकास आघाडीची वेगळी चूल मांडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेने भाजपाला विरोधी बाकांवर बसविले आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आगामी काळात आक्रमक टीकास्त्र सोडणार हे नक्की. मात्र किरीट सोमय्या यांच्या आरोपाला शिवसेनेकडून काय उत्तर मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.