Join us

Video - "शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व"; शिंदे गटाचा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:49 PM

मुंबईतील आझाद मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यासाठी यंदा शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महिन्याभरापूर्वीच अर्ज करण्यात आले होते. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकृतरीत्या मागे घेतला. शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. "शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! शिवसेनेचा दसरा मेळावा... चलो आझाद मैदान... टीझर प्रकाशित" असं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप आहे. यासोबतच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा… असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या ऑडिओ क्लिपमध्ये "या मर्दाची टक्कर घेण्याची हिंमत कुणीही करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्तानात उभं राहिलं पाहिजे. ते चित्र मी हिंदुंच्या आणि हिंदुत्वाच्या रुपाने उभा करतोय" असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील "ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांची ही शिवसेना आहे" असं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार असा पेच निर्माण झाला. हा वाद न्यायालयात गेला होता. त्यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र शिंदे गटाने अर्ज मागे घेतला. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेराजकारणबाळासाहेब ठाकरे