मुंबई - विदेशात गेल्यानंतर महागड्या वस्तू किंवा सोनं भारतात आणण्याचा मोह प्रवाशांना आवरत नाही. अनेकदा महागड्या वस्तू किंवा सोनं हे स्मगलिंग करुनही भारतात आणलं जातं. भारतात येऊन त्या सोन्याचा व्यापार केला जातो. शासनाचा महसूल बुडवत महागड्या वस्तूंची तस्करीही केली जाते. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची झाडाझडती घेतली जाते. प्रवाशांच्या सामानांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यातून, अनेकदा मौल्यवान वस्तू आढळून येतात. मुंबई विमानतळावर अशाचप्रकारे पायातील सँडलमधून सोन्याच्या वस्तूंची तस्करी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून आणलेलं सोनं जप्त केलं आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाने ८ वेगवेगळ्या कारवायांमधून ३.०२ किलो सोनं आणि ४ आयफोन जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सोन्याची बाजारभावानुसारची किंमत १.७६ कोटी रुपये एवढी आहे. तर, ४ आयफोनची किंमत विदेशी चलनानुसार ११८३५० युएस डॉलर्स एवढी आहे. विविध प्रवाशांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हे सोनं लपवून तस्करी करण्यात येत होती.
शरिरावरील विविध भागात सोनं लपवून भारतात आणण्यात आलं. त्यामध्ये, छोट्याशा बॉक्समधून, हँड ब्लेंडरमधून, कपड्यांतून, खेळण्यांमधून आणि पायातील सँडलमधूनही हे सोनं लपवून तस्करी करण्यात येत होतं. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांनी कसून तपास केला असता ही चोरी उघडकीस आली आहे. त्यानंतर, हे सोनं जप्त करण्यात आलं असून सबंधित प्रवाशांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सँडलमधून सोनं बाहेर काढतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.