VIDEO : भाईंदरमध्ये तेरेसा मंदिरासभोवतालच्या कुंपण भिंतीवरील कारवाईमुळे तणाव
By Admin | Published: November 5, 2016 04:12 PM2016-11-05T16:12:51+5:302016-11-05T17:13:08+5:30
राजू काळे , ऑनलाइन लोकमत भाईंदर, दि. ५ - उत्तनच्या धावगी -डोंगर येथील घनकचरा प्रकल्पाशेजारी गेल्या 20 वर्षांपासून ख्रिस्ती ...
राजू काळे , ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. ५ - उत्तनच्या धावगी -डोंगर येथील घनकचरा प्रकल्पाशेजारी गेल्या 20 वर्षांपासून ख्रिस्ती समाजातील स्थानिक मच्छीमार समाजाने बांधलेल्या संत मदर तेरेसा मंदिरासभोवताली अलीकडेच दगडी भिंत बांधण्यात आली. हि भिंत बेकायदेशीरपणे मीरा-भाईंदर पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या जागेवर बांधल्याने त्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्तात शनिवारी तोडक कारवाई करण्यात आली. त्याला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला असता तो पोलिसांनी बळाच्या जोरावर मोडीत काढला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी पोलिसांनी महिला विरोधकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. येथील घनकचरा प्रकल्पाशेजारी सुमारे 200 वर्षांपूर्वी एक क्रॉस बांधण्यात आला. 20 वर्षांपूर्वी क्रॉसच्या समोर ख्रिस्ती समाजातील स्थानिक मच्छीमारांनी लोकवर्गणीतून संत मदर तेरेसांचे मंदिर बांधले. यानंतर 2008 मध्ये तेथे स्थानिकांचा विरोध असतानाही घनकचरा प्रकल्प सुरु करण्यात आला. मंदिराशेजारी रात्रीच्यावेळी मद्यपींचा उपद्व्याप वाढून परिसरात घाण केली जात असल्याने स्थानिकांनी मंदिराशेजारी कुंपणभिंत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच या भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. मंदीरालगत संत मदर त्रिजा समाज कल्याण केंद्राची जागा असल्याचा फलकही लावण्यात आला. परंतु, मंदिरासह बांधलेल्या कुंपणभिंतीची जागा पालिकेची असल्याने बांधण्यात आलेल्या कुंपणभिंतीने तब्बल 3 ते 4 एकर जागा अनधिकृतपणे व्यापल्याचा दावा पालिकेने केला. त्याची माहिती मिळताच पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांच्या नेत्रुत्वाखाली शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता भिंतीच्या तोडकी कारवाईला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी पालिकेने पाठविलेल्या नोटीसमुळे कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी मोठ्याप्रमाणात मंदिर परिसरात गर्दी केली. कारवाईला सुरुवात होताच स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध करीत तिला रोखण्यासाठी महिला थेट कुंपणभिंतीवर चढल्या. पोलिसांनी त्वरित ज्यादा कुमक मागवून स्थानिकांचा विरोध मोडीत काढला. त्यामुळे कारवाई त्वरित पार पाडण्यात आली. दरम्यान पोलिसांनी महिला विरोधकांना धक्काबुक्की करीत लाठीचा मार दिल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे परिसरात दुपारी एक वाजेपर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पालिकेने केलेल्या कारवाईचा स्थानिकांनी तीव्र निषेध करीत याच जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असताना प्रशासनाला ते दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय कारवाईवेळी स्थानिकांच्या मदतीला एकही लोकप्रतिनिधी हजार नसल्याने नाराजी व्यक्त केली.
https://www.dailymotion.com/video/x844gyr