सुजय विखेंचा तो Video संशयास्पद, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचे अनेक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:37 PM2021-04-25T14:37:29+5:302021-04-25T14:38:11+5:30
खासदार विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. त्यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबई - भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुजय विखेंचा व्हिडिओ संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.
खासदार विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. त्यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिल्याचं त्यांनी म्हटलं. विखेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना, सुजय विखेंना हे इंजेक्शन मिळालेच कसे?, असा सवाल अनेकांनी फेसबुकवर विचारला आहे. आता, रुपाली चाकणकर यांनीही ट्विटरवरुन सुजय विखेंनी विमानातून आणलेल्या बॉक्समध्ये संशयीत वस्तू असल्याचा दावा केला आहे.
''खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.'', असे अनेक सवाल चाकणकर यांनी विचारले आहेत.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
काय म्हणाले होते सुजय विखे
विखे म्हणाले की, ‘आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे, असे विखे पाटील यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
इंजेक्शन कोठून आणली?
विखे यांनी गत सोमवारी विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.