Video: सुजय विखे ठामपणे म्हणाले होते, 'मी भाजपात जाणार नाही, उमेदवारी घेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:03 PM2019-03-12T15:03:29+5:302019-03-12T15:04:11+5:30
सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशावर नगर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत.
मुंबई - काँग्रेसचे माजी नेते आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना, आपण 'भाजपात जाणार नाही, उमेदवारी घेणार नाही', असे सुजय यांनी म्हटले होते. त्यामुळे, सुजय विखेंनी काही दिवसांतच आपला शब्द पाळला नसल्याचे समोर आले आहे. नगर जिल्ह्यातील काही भाजपा कार्यकर्त्यांकडून विखेंचा हा व्हिडीओ व्हायरल करण्यत येत आहे.
सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशावर नगर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच, दिलीप गांधी समर्थकांकडूनही विखेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध होत आहे. तर, जामखेड आणि कर्जत तालुक्यातूनही सुजय यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला मोठा विरोध आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी मी कदापी भाजपात जाणार नसल्याचे म्हटले होते. तसेच वेळ आलीच तर मी अपक्ष निवडणूक लढवले, असेही सुजय यांनी म्हटले होते. मात्र, आपल्या वक्तव्यावर ठाम न राहिल्यामुळे सुजय विखे पाटील यांच्याविरोधात काही भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तर, दिलीप गांधी हे सामान्य कार्यकर्ता ते नेते असा त्यांचा प्रवास असून घराणेशाहीवरुन मिळणाऱ्या उमेदवारीलाही भाजपा कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय विखे-पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो, अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सुजय विखे-पाटलांनी सांगितलं आहे. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागल्याची खंत आहे, असंही सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ :